कधी कधी प्रेम आणि विश्वासाच्या आंधळ्या प्रवासात नशीब हस्तक्षेप करते, पण प्रत्येकवेळी शेवट गोडच होतो, असं नाही. कॅनडामधील विनिपेग शहरात घडलेली एक अशीच घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या शहरात ३० कोटी रुपयांच्या एका लॉटरीमुळे प्रेमाचं नातं संपलं आणि एक कायदेशीर लढा सुरू झाला.
मुलीवर विश्वास ठेवून लॉटरी दिली अन्..
लॉरेन्स कॅम्पबेल नावाच्या तरुणाने २०२४ मध्ये एक लॉटरी तिकीट खरेदी केले होते. त्याच्या म्हणण्यानुसार, वैध ओळखपत्र आणि बँक खाते नसल्याने तो स्वतः बक्षीसावर दावा करू शकत नव्हता. त्यामुळे त्याने आपली गर्लफ्रेंड क्रिस्टल अॅन मॅके हिच्यावर विश्वास ठेवत तिला लॉटरीचे पैसे घेण्याची परवानगी दिली.
त्यावेळी दोघे एकत्र राहत होते, नातेसंबंधात होते, आणि लॉरेन्सच्या म्हणण्यानुसार, त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. जिंकलेल्या ५० लाख कॅनेडियन डॉलरची (अंदाजे ३० कोटी रुपये) रक्कम त्याने क्रिस्टलच्या बँक खात्यात जमा केली होती.
पुढे घडलं असं काही की...
त्यांना आधी यात काही वावगं वाटलं नाही. त्यांनी एकत्र व्हिडीओ रेकॉर्ड केला, तिकीटाची पडताळणी केली, आणि चेकही घेतला. त्यावेळी लॉरेन्सने ही रक्कम 'क्रिस्टलसाठी वाढदिवसाची भेट' असल्याचेही म्हटले होते. मात्र, काही दिवसांतच क्रिस्टल गायब झाली. तिने लॉरेन्सशी सर्व संपर्क तोडला, त्याला सोशल मीडियावरून ब्लॉक केले, आणि त्याच्याविरुद्ध कोर्टातून संरक्षण आदेश घेतला. पुढे, लॉरेन्सला ती एका नव्या पुरुषाला डेट करत असल्याचे आढळले.
आता कायदेशीर लढत सुरू
या घोटाळ्यानंतर लॉरेन्स कॅम्पबेलने मॅनिटोबा कोर्ट ऑफ किंग्ज बेंचमध्ये खटला दाखल केला आहे. प्रतिवादींमध्ये त्याची माजी प्रेयसी क्रिस्टल मॅके, वेस्टर्न कॅनडा लॉटरी कॉर्पोरेशन आणि मॅनिटोबा लिकर अँड लॉटरीज यांचा समावेश आहे.
कॅम्पबेलच्या वकिलांनी असा आरोप केला की, लॉटरी एजन्सींनी त्याला दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर बक्षीस घेण्याचे धोके समजावून सांगितले नाहीत. जर त्यांनी आधीच यांची कल्पना दिली असती, तर अशी परिस्थिती टळू शकली असती.
दुसरीकडे, क्रिस्टल मॅकेच्या वकिलाने स्पष्ट केले की सर्व आरोप निराधार आहेत आणि ते न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडतील.