मुले जन्माला घाला मात्र, हॉटेलमध्ये आणू नका, दक्षिण कोरियात अनेक ठिकाणी बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 06:53 AM2023-06-27T06:53:15+5:302023-06-27T06:53:38+5:30
South Korea: दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात कमी जन्मदर असलेला देश आहे. महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत यासाठी सरकारने १६ वर्षांत १६ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.
सेऊल : दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात कमी जन्मदर असलेला देश आहे. महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत यासाठी सरकारने १६ वर्षांत १६ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. असे असताना अलीकडे अनेक कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये लहान मुलांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. यामुळे मुलांना जन्म न देण्याच्या मानसिकतेत वाढ होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
प्रौढांना शांत वातावरण देणे हा त्यामागचा उद्देश आहे. एकट्या जेजू बेटावर अशी ८० ठिकाणे आहेत, जिथे मुलांना कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. देशभरात अशा झोनची संख्या ५०० हून अधिक आहे.
हैंकुक रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, २०२१ मध्ये १० पैकी ७ लोक लहान मुलांना प्रवेशास मनाई करण्याच्या बाजूने होते. येथील नेत्या योंग हाय-इन यांच्यामुळे अलीकडच्या काही दिवसांत अशा झोनच्या विरोधात निषेध वाढला आहे. योंग नुकत्याच परवानगी नसताना नॅशनल असेंब्लीच्या बैठकीत दोन वर्षांच्या मुलासह आल्या होत्या. त्या म्हणाल्या की, अशा झोनला बेकायदेशीर घोषित करण्यासाठी संसदेत विधेयकावर चर्चा सुरू आहे.
मुले का नकोत?
दक्षिण कोरियामध्ये जन्मदर केवळ ०.७८ आहे. मुलांच्या संगोपन आणि घरासाठी येणारा वाढता खर्च तसेच नोकऱ्यांची कमतरता आणि भविष्याची चिंता यामुळे मुले जन्माला घालण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे.
कुणा-कुणाला बंदी?
आता येथे लहान मुलांना बंदी, वरिष्ठ नागरिकांना बंदीचे झोन तयार होत आहेत. मोठ्या प्रमाणात ५० वर्षे वयोगटातील लोकांसाठीही बंदीचे झोन आहेत. सेऊलमधील एक रेस्टॉरंट ४९ वर्षांवरील लोकांवर बंदी घातल्यानंतर लोकप्रिय झाले. या वयातील पुरुष महिला कर्मचाऱ्यांना त्रास देऊ शकतात, असा त्यांचा युक्तिवाद आहे. काही रेस्टॉरंट्सनी ‘नो-रॅपर झोन’, ‘नो-युट्यूबर झोन’ व अगदी ‘नो-प्रोफेसर झोन’ घोषित केले आहेत.
२०१२ पासून सुरुवात
‘नो किड्स झोन’ची सुरुवात २०१२ मध्ये झाली. मुलाच्या आईने रेस्टॉरंटला जबाबदार धरले होते. अपघातापूर्वी लहान मूल इकडे तिकडे धावत असल्याचे कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसल्यानंतर लोकांचे मत परिवर्तन होण्यास सुरुवात झाली.