पाक रेंजर्सच्या ठाण्यावर दिसला हफीज सईद
By Admin | Updated: January 6, 2015 02:40 IST2015-01-06T02:40:30+5:302015-01-06T02:40:30+5:30
लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक व २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद पाकिस्तानी रेंजर्सच्या ठाण्यावर शनिवारी दिसला असल्याचे वृत्त आहे.

पाक रेंजर्सच्या ठाण्यावर दिसला हफीज सईद
नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक व २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद पाकिस्तानी रेंजर्सच्या ठाण्यावर शनिवारी दिसला असल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरवर जिथे पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार चालू आहे, तिथेच सईद आढळला.
भारत-पाक सीमेवर सईद आढळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गतवर्षीही हफीज सईद याने सीमाभागाला अनेक वेळा भेट दिली होती. या भागात गतवर्षी त्याने अनेक सभाही घेतल्या व भारतावर विखारी टीका केली. शनिवारी रात्री पाक सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला नाही; पण त्या भागात वाहनांची वर्दळ दिसली व हफीज सईद झिंदाबादचे नारे ऐकू आले. हे ठिकाण सांबा सेक्टरपासून फक्त ५०० मीटर अंतरावर आहे. शनिवारी पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळाबारीमुळे १४०० नागरिक या भागातून स्थलांतरित झाले आहेत. कठुआ जिल्ह्यातील हिरानगर, चान कत्रिया, मारेन व सांबा येथील रीगल व चिक येथे निर्वासित छावण्या आहेत. तिथे हे लोक सुरक्षिततेसाठी गेले आहेत. लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हफीज सईद हा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असून, भारताला सर्वाधिक हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)