H-1B Visa: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सत्ता मिळवल्यापासून सातत्याने मोठे निर्णय घेत आहेत. विशेषतः अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांबाबत ते धक्कादायक निर्णय घेत आहेत. आता त्यांनी H1-B व्हिसाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. हा व्हिसा मिळवण्यासाठी उमेदवाराला तब्बल 1 लाख डॉलर्स (88 लाख भारतीय रुपये) मोजावे लागणार आहेत. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांवर पडणार आहे. दरम्यान, हा H1-B व्हिसा नेमका कशासाठी असतो आणि तो मिळवण्यासाठी काय करावे लागते? हे जाणून घ्या...
या व्हिसाची आवश्यकता का आहे?
'अमेरिकन ड्रीम' पाहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी H-1B व्हिसा अतिशय महत्वाचा आहे. थोडक्यात सांगायचे तर, हा व्हिसा अमेरिकेत नोकरी करण्याचा परवाना आहे. अमेरिकन कंपन्यांना उच्च शिक्षण घेतलेल्या किंवा विशेष कौशल्य असलेल्या परदेशी नागरिकांना नोकरीवर ठेवण्यासाठी हा व्हिसा गरजेचा आहे. IT, इंजिनिअरिंग, फायनान्स आणि मेडिकलसारख्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी भारतीयांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे.
साधारण 3 वर्षे वैधता
या व्हिसाची सुरुवात 1990 मध्ये झाली होती. हा व्हिसा सुरुवातीला तीन वर्षांसाठी दिला जातो, परंतु तो जास्तीत जास्त सहा वर्षांपर्यंत वाढवता येतो. ज्यांना ग्रीन कार्ड (कायमस्वरूपी निवासस्थान) मिळाले आहे, त्यांना आपला व्हिसा अनिश्चित काळासाठी नूतनीकरण करता येतो. पूर्वी, H-1B व्हिसासाठी वार्षिक शुल्क 1 ते 8 लाख रुपये होते, जे आता 10 पटीने वाढून जवळजवळ 88 लाख रुपये करण्यात आले आहे.
H1-B व्हिसा कसा मिळणार?
H-1B अर्ज स्वतः उमेदवार करू शकत नाही.
अमेरिकेतील कंपनीने स्पॉन्सर करणे आवश्यक आहे.
उमेदवार/कर्मचारी कमीत कमी बॅचलर डिग्री किंवा त्यासमान शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे.
ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्या विषयात डिग्री/अनुभव आवश्यक आहे.
खर्च किती येतो?
खर्च प्रामुख्याने कंपनी करते. पण काही वेळा उमेदवाराला काही भाग भरावा लागू शकतो.
अंदाजे फी:
USCIS Filing Fees: $1,710 – $2,460 (विविध श्रेणींवर अवलंबून)
Fraud Prevention Fee: $500
ACWIA Training Fee: $750 (लहान कंपनीसाठी) / $1,500 (मोठ्या कंपनीसाठी)
Premium Processing (Optional): $2,500 (जलद उत्तर हवे असल्यास)
वकील फी (Attorney Fees): साधारण $2,000 – $4,000
एकूण खर्च साधारण $6,000 – $10,000 पर्यंत जाऊ शकतो. (यात मोठा भाग नियोक्ता उचलतो).
महत्वाच्या गोष्टी
दरवर्षी H-1B साठी लॉटरी सिस्टम असते (साधारण 85,000 व्हिसा मर्यादा).
H-1B मिळाल्यावर तुम्ही फक्त त्या स्पॉन्सर कंपनीसाठीच काम करू शकता.
व्हिसा संपल्यानंतर अमेरिकेत राहण्यासाठी H-1B एक्स्टेन्शन किंवा ग्रीन कार्ड प्रोसेस सुरू करावी लागते.
भारतीय उमेदवारांचा सर्वाधिक फायदा
अमेरिकेच्या सरकारी आकडेवारीनुसार, H-1B व्हिसा धारकांमध्ये भारतीयांचा सर्वाधिक वाटा (70% पेक्षा जास्त) आहे. विशेषत: IT आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील व्यावसायिक या व्हिसासाठी आघाडीवर आहेत. H-1B व्हिसा भारतीय व्यावसायिकांसाठी अमेरिकेत करिअरचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रमुख मार्ग आहे. मात्र, त्यासाठी लागणारा मोठा खर्च, मर्यादित व्हिसांची संख्या आणि लॉटरी सिस्टीममुळे स्पर्धा अत्यंत कठीण आहे. अशातच, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकन ड्रीम पाहणाऱ्यांना इतर अडचणींसह आर्थिक अडचणींचा सामनाही करावा लागणार आहे.