लख्वीच्या जामिनाला सरकारचे आव्हान
By Admin | Updated: January 2, 2015 02:29 IST2015-01-02T02:29:17+5:302015-01-02T02:29:17+5:30
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लख्वी याला जामीन देण्याच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाक सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

लख्वीच्या जामिनाला सरकारचे आव्हान
इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लख्वी याला जामीन देण्याच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाक सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. लख्वी याची सुटका झाल्यास कायदा व सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा सरकारचा दावा आहे.
पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून लख्वीला जामीन दिला आहे. लख्वी बाहेर आल्यास कायदा व सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे सरकारच्या याचिकेत म्हटले आहे. पाक सरकारने सार्वजनिक कायदा व सुरक्षा कायम ठेवण्यासाठी लख्वीला अटक केली होती; पण हा दावा दुर्बळ असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते.
लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निकाल लावून धरणार असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाकडून नोटीस आल्यानंतर अब्बासी बोलत होते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी लख्वी याला सशर्त जामीन मंजूर केला होता. लख्वीने १० लाख रुपयांची जमानत ठेवावी, तसेच मुंबई हल्ल्याच्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहावे, असे न्यायालयाने म्हटले होते. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर सरकारने दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर अपहरणाचा खटला दाखल केला होता.
लख्वीला (५४) १८ डिसेंबर रोजी हा जामीन मिळाला होता. त्यानंतर पुन्हा झालेल्या अटकेला त्याने आव्हान दिले. सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सरकारचा आदेश रद्द केला, त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. ८ जानेवारी रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाची हिवाळी सुटी संपणार असून, त्यानंतर लख्वीच्या जामिनाला आव्हान देऊ, असे सरकारने म्हटले होते. (वृत्तसंस्था)
४२००८ सालातील मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झकी उर रेहमान लख्वी याला आज पुन्हा रावळपिंडी तुरुंगात जावे लागले. लख्वीवर सरकारने दाखल केलेल्या अपहरणाच्या प्रकरणात न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. लख्वीचा दोन दिवसांचा रिमांड संपल्यानंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.