अमेरिकेत सरकारचे कामकाज बंद; खर्चास संमती नसल्याने शटडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:34 IST2018-01-21T00:34:01+5:302018-01-21T00:34:12+5:30
अमेरिका ही जागतिक महासत्ता म्हणून ओळखली जात असली तरी मध्यरात्रीपासून अमेरिका आर्थिक संकटात सापडली आहे. सरकारी खर्चाच्या एका विधेयकाला सिनेट सदस्यांनी मंजुरी न दिल्याने ट्रम्प प्रशासन व सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे.

अमेरिकेत सरकारचे कामकाज बंद; खर्चास संमती नसल्याने शटडाउन
वॉशिंग्टन : अमेरिका ही जागतिक महासत्ता म्हणून ओळखली जात असली तरी मध्यरात्रीपासून अमेरिका आर्थिक संकटात सापडली आहे. सरकारी खर्चाच्या एका विधेयकाला सिनेट सदस्यांनी मंजुरी न दिल्याने ट्रम्प प्रशासन व सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे.
खर्चाच्या विधेयकाला मंजुरी न मिळाल्याने अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडण्याची तसेच कित्येक सरकारी लाखो कर्मचाºयांची नोकरी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अॅक्ट लागू आहे. त्यामुळे निधीची कमतरता भासल्यास वा निधीला मंजुरी न मिळाल्यास सरकारी यंत्रणांना त्यांचे कामकाज थांबवावेच लागते.
निधीतील तूट भरून काढण्यासाठी सरकार स्टॉप गॅप बिल (तात्पुरती व्यवस्था करणे) आणते. अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाबरोबरच सिनेट सदस्यांचीही त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते. ते बिल प्रतिनिधी मंडळाने मान्य केले. पण सिनेटमध्ये त्यावर चर्चा सुरू असताना, रात्रीचे १२ वाजले आणि त्यामुळे विधेयकास मंजुरी न मिळाल्याने अमेरिकेवर शटडाऊनची वेळ आली.
डेमॉक्रेट्सवर खापर
आर्थिक संकट टाळण्यासाठी हे बिल पास होणे आवश्यक होते. मात्र तसे होऊ शकले नाही. त्याचे सारे खापर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमॉक्रेट्सवर फोडले आहे. त्यांच्यामुळे देशावर आर्थिक संकट आले, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)
सहाव्यांदा उद्भवली ही स्थिती
बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना २०१३ मध्येही असे घडले होते. तेव्हा सरकारी कामकाज दोन आठवडे पूर्णपणे बंद झाले होते आणि ८ लाख लोकांना घरी बसण्याची वेळ आली होती. त्याआधीही पाच वेळा अमेरिकेत असे शटडाउन झाले होते. नागरी व राष्ट्रीय सुरक्षा यांवर शटडाउनचा परिणाम होत नाही. त्यातील कर्मचारी काम करत राहतील, पण निधीची व्यवस्था होईस्तोवर त्यांना वेतन दिले जाणार नाही.