विश्वास पाटील, पर्थ (ऑस्ट्रेलिया): जगाचे दुसरे टोक असलेल्या ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात अत्यंत पारंपरिक उत्साहात गणोशोत्सव साजरा झाला...बाप्पाच्या आरतीचे मंजुळ स्वर, विविध गुणदर्शनाचा उत्तम कार्यक्रम, उत्साह आणि भक्ती भावाने भारलेले वातावरण आणि त्याला कडाडणाऱ्या ढोलताशांची साथ अशा वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला...
मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर तो अगोदर माणूस जोडतो आणि आपली संस्कृती जपतो.. त्याचेच प्रत्यनंतर या उत्सवात पर्थमध्येही गेली आठवडाभर येत आहे..पर्थसह सिडनी, मेलबर्न, एडलेड आदी शहरातही हा उत्सव तितक्याच उत्साहाने साजरा झाला...
पर्थमध्ये नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने सुमारे दोन हजारावर महाराष्ट्रायीन लोक राहतात..मुख्यत खाण उधोग, माहिती तंत्रज्ञान, ऑस्ट्रेलियीन सरकार, बँकिंगमध्ये आहेत...त्यांनी आपल्या सेवेतून तिथेही उत्तम छाप उमटवली आहे..त्यांचे येथे पर्थ गणेशोत्सव मंडळही २००४ पासून आहे..अनेक लोक घरोघरी मूर्ती प्रतिष्ठापना करतात...त्यासाठी अगदी महाराष्ट्रातील पेणमधून सुबक मूर्ती आणतात...प्रत्येकजण त्यानिमित्ताने आपापल्या घरी छोटा महाप्रसाद करून आपल्या गोतावळ्यातील लोकांना बोलवतात...बाप्पाची आरास तरी देखणी करतात...रोज बाप्पाच्या आरतीने परिसर मांगल्यमय वातावरणाने सुगंधित होऊन जाते...
अनंतचतुर्थीला दिवसभर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम असतात..सकाळी आरती झाल्यावर महाप्रसाद असतो..त्यानंतर विविध गुणदर्शन सोहळा होतो..त्यामध्ये प्रत्येकजण हिरीरीने सहभागी होतो..कॉलेज जीवनात होणाऱ्या गॅदरिंगचा फील त्यातून येतो..पण इथला सोहळा पूर्णतः बाप्पाच्या सेवेशी जोडलेला असतो. सुमारे तीन तास हा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मग ढोलताशे कडकडायला लागतात..मंडळाने सुमारे ६० हून अधिक ढोल स्वतः घेऊन त्याचे पथक केले आहे...त्याचा सराव करून बाप्पाच्या आगमनाची हे पथक वाट पाहत असते...सुमारे अर्धातास हे पथक तहानभूक हरपून ढोलताशे वाजवत असते..ते ऐकून इतरांचे पाय थिरकायला लागतात...मालवणचे वैभव पाटकर आणि सहकाऱ्यानी त्यासाठी कष्ट घेतले आहेत...हा गजर झाल्यावर मग पुन्हा महाप्रसाद होऊन सोहळ्याची सांगता होते. विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जित करून या सोहळ्याची सांगता होते..या देशात नदीत मूर्ती विसर्जन करायला कायद्याने बंदी आहे..
महाराष्ट्र मंडळ पर्थच्या अध्यक्षा डॉ.अंजली गद्रे म्हणाल्या, आम्ही या सोहळ्याच्या निमित्ताने सारेजण एकत्र येतो आणि उत्साहात सण साजरा करतो...मंडळाची स्थापना २००४ साली झाली असून प्रतिवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. भारताचा स्वातंत्र्यदिन, शिवजयंती, गुढीपाडवाही तितक्याच आनंदात साजरा केला जातो..रक्तदान शिबीरासही तितकाच चांगला प्रतिसाद असतो..
मूळचे गारगोटी (जिल्हा कोल्हापूर) चे संजय पाटील म्हणाले, अशा सोहळ्यात एकत्र आल्याने नव्या ओळखी होतात, त्यातून आपलेपणाचा बंध अधिक घट्ट होतो..
मूळचे भुसावळ (जिल्हा जळगाव ) चे सोपान संतराम पाटील सांगतात, आम्ही येथे आल्यापासून मूर्ती प्रतिष्टापणा करतो. आम्हाला आमच्या मूळ गावाशी, संस्कृतीशी जोडणारा हा सोहळा वाटतो म्हणून आम्ही तनमन अर्पण करत तो साजरा करतो..
आयटीमध्ये असलेले मूळचे पुसद (जिल्हा यवतमाळ) अनिल ओमन्नावार म्हणाले, अशा सणासमारंभातून एकत्र येण्याने सामाजिक वीण अधिक घट्ट होते. आम्ही आमचे गाव, महाराष्ट्र, देश मागे सोडून आलो असलो तरी येथे गावपणाची संस्कृतीचेच अशा कार्यक्रमातून जतन होते...
तल्लीनता
आपण महाराष्ट्रातही उत्सवात रोज सकाळ-संध्याकाळ बाप्पाची आणि शिव-पार्वतीचीच आरती म्हणत असतो..पण येथे पाचसहा आरत्या अगदी तल्लीन होऊन म्हटल्या जातात..अगदी नवीन पिढीलाही त्या सर्व आरत्या, पुष्पांजली मंत्रही तोंडपाठ असतो इतके हे सर्वजण या उत्सवात एकरूप होत असल्याचे चित्र अनुभवास आले..