रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या २५०० सैनिकांचे भवितव्य अंधारात; खटले दाखल करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:02 AM2022-05-23T06:02:52+5:302022-05-23T06:03:36+5:30

राखरांगोळी केलेल्या मारियुपोल शहरावर आता रशियाने आता संपूर्ण कब्जा मिळविला आहे.

future of 2500 russian occupied ukrainian troops is in the dark | रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या २५०० सैनिकांचे भवितव्य अंधारात; खटले दाखल करण्याचा विचार

रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या २५०० सैनिकांचे भवितव्य अंधारात; खटले दाखल करण्याचा विचार

Next

मारियुुपोल : युक्रेनच्या मारियुपोल शहरातील स्टील प्रकल्पातील २५०० सैनिकांना रशियाने युद्धकैदी बनविले आहे. त्यांच्यावर रशिया युद्ध गुन्हेगारीचे खटले दाखल करण्याच्या विचारत आहे. त्यामुळे युक्रेनच्या या सैनिकांचे भवितव्य अंधारात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

राखरांगोळी केलेल्या मारियुपोल शहरावर आता रशियाने आता संपूर्ण कब्जा मिळविला आहे. सुमारे तीन महिने मारियुपोल शहराला रशियाच्या लष्कराने वेढा दिला होता. या कालावधीत तिथे झालेल्या लढाईत युक्रेनचे २० हजार नागरिक ठार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मारियुपोल शहरावर आम्ही पूर्ण कब्जा केला असल्याचे रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई सोइगु यांनी नुकतेच जाहीर केले होते. 

रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या २५०० सैनिकांचा कोणत्याही प्रकारे छळ करू नये, अशी मागणी ॲम्नेस्टी इंटरनॅशनल तसेच रेडक्रॉस संस्थेनेही केली आहे. युद्धकैद्यांबाबत झालेल्या जिनिव्हा कराराचे रशियाने पालन करावे, अशी मागणी युक्रेनसहित काही देशांनीही केली होती. या युद्धकैद्यांचे भविष्य काय असेल, याची चिंता त्यांच्या कुटुंबीयांना लागली आहे. या सैनिकांची मुक्तता होण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियावर दडपण आणावे, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी नुकतेच केले होते. 

मारियुपोल शहरातील युक्रेनचा अखेरचा बालेकिल्ला म्हणजे अझोवत्सल स्टील प्रकल्प होता. त्याच्या आडोशाने युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या लष्कराला कडवी झुंज दिली होती; मात्र अखेर तुटपुंज्या बळामुळे या सैनिकांनी रशियापुढे शरणागती पत्करली. पोलंडच्या राष्ट्रपतींच्या युक्रेन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने रविवारी युक्रेनच्या डोनबासमध्ये हल्ले वाढविले आहेत. रशियाने आता डोनबासमध्ये क्षेपणास्त्र हल्ले सुरु केले आहेत.

डोनबासमध्ये हल्ल्यांचे प्रमाण वाढले

- युक्रेनमधील डोनबास या प्रदेशात रशियाने रविवारी हल्ल्यांचे प्रमाण वाढविले आहे. 

- मारियुपोल कब्जात आल्यानंतर पूर्व युक्रेनमधील युद्ध आघाडीवर रशियाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तेथील औद्योगिक पट्ट्यावर लवकरात लवकर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.

Web Title: future of 2500 russian occupied ukrainian troops is in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.