फ्रान्स; संशयित महिला सिरीयात
By Admin | Updated: January 13, 2015 00:05 IST2015-01-13T00:05:59+5:302015-01-13T00:05:59+5:30
दहशतवादाचा निषेध करण्यासाठी फ्रान्समध्ये लाखो लोकांचा मोर्चा काढण्यात आला असताना , फ्रान्समधील सुरक्षा दले जिच्या शोधासाठी जंग जंग पछाडत आहेत

फ्रान्स; संशयित महिला सिरीयात
इस्तंबुल : दहशतवादाचा निषेध करण्यासाठी फ्रान्समध्ये लाखो लोकांचा मोर्चा काढण्यात आला असताना , फ्रान्समधील सुरक्षा दले जिच्या शोधासाठी जंग जंग पछाडत आहेत, त्या दहशतवादी महिलेने सिरियाची सीमा ८ जानेवारी रोजीच ओलांडली, असा दावा तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेवलत कावुसोगलू यांनी केला आहे.
हयात बौमेद्दीन असे या संशयित महिलेचे नाव असून पॅरिसमधील हल्ल्यातील आरोपींची ती महिला साथीदार आहे. तिची छायाचित्रे सर्वत्र प्रसिद्ध झाली असून, ती सशस्त्र व धोकादायक असल्याचा इशारा फ्रेंच पोलिसांनी दिला आहे. ही महिला २ जानेवारीला इस्तंबुलमध्ये आली असून ती हॉटेलमध्ये राहिली, असे कावसोगलू यांनी सांगितले. मग पॅरिसमधील हल्ल्यात ती सहभागी नव्हती असा अर्थ काढावा लागेल. त्याखेरीज हल्लेखोर मोकळे असतानाच ती सिरियाला चालती झाली असेही म्हणावे लागेल.
पॅरिसमधील शार्ली हेब्डो साप्ताहिकावर ७ जानेवारी रोजी हल्ला झाला व कोशेर येथील ओलिस नाट्य शुक्रवारी ९ जानेवारीला संपले. या हिंसाचारात सहभागी असणारे तीनही हल्लेखोर आता मारले गेले आहेत. फ्रेंच पोलीस बौमेद्दीनचा शोध घेत आहेत.
२६ वर्षाची ही महिला सशस्त्र व धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तुर्कस्तानी अधिकाऱ्यानी तिच्या ठावठिकाणांची माहिती फ्रेंच अधिकाऱ्याना दिली आहे.
पॅरिस येथील रविवारच्या महामोर्चात जागतिक नेते हातात हात घालून सहभागी झाले. मुस्लिम व ज्यू नेत्यानी रविवारी पॅरिसच्या लाखो नागरिकांसोबत हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. (वृत्तसंस्था)