अमेरिकेमध्ये विमानअपघातांची मालिका सुरूच असून, मागच्या १२ दिवसांमध्ये देशात चौथा विमानअपघात झाला आहे. आता अॅरिझोना राज्यातील स्कॉट्सडेल विमान तळावर दोन खाजगी विमानांची टक्क झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झााला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर येथील धावपट्टी विमानांसाठी बंद करण्यात आली आहे.
स्कॉट्सडेल विमानतळावरील समन्वयक केली कुएस्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार एक मध्यम आकाराचं व्यावसायिक जेट विमान दुसऱ्या एका मध्यम आकाराच्या जेट विमानावर जाऊन आदळलं. त्यामुळे हा अपघात झाला. हे विमान टेक्सास येथून येत होते. तसेच त्यामधून चार जण प्रवास करत होते. तर उभ्या असलेल्या विमानात एक व्यक्ती होती.
स्कॉट्सडेल अग्निशमन दलाचे कॅप्टन डेव्ह फोलियो यांनी सांगितले की, या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोन जणांना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यातील एकाची प्रकृती स्थिर आहे. तर या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या अरघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांत झालेला अमेरिकेतील हा चौथा विमान अपघात आहे. या आधी झालेल्या दोन मोठ्या विमान अपघातांमध्ये २९ जानेवारी रोजी एक विमान आणि हेलिकॉप्टर यांच्यात झालेल्या टक्करीमध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ३१ जानेवारी रोजी फिलाडेल्फिया येथे झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला होता.