चार दहशतवाद्यांना फाशी
By Admin | Updated: December 22, 2014 05:18 IST2014-12-22T02:57:34+5:302014-12-22T05:18:40+5:30
पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आणखी चार दहशतवाद्यांना फैसलाबाद येथील तुरुंगात रविवारी फाशी देण्यात आली.

चार दहशतवाद्यांना फाशी
इस्लामाबाद : पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आणखी चार दहशतवाद्यांना फैसलाबाद येथील तुरुंगात रविवारी फाशी देण्यात आली. पाक सरकारने फाशीवरील बंदी उठविल्यानंतर देण्यात आलेली ही दुसरी फाशीची शिक्षा आहे.
फाशी देण्यात आलेल्या आरोपीत, झुबैर अहमद, रशिद कुरेशी , गुलाम सरवर भट्टी, अखलक अहमद यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे माजी लष्करशहा व हुकुमशहा यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप या चारजणांवर होता. फैसलाबाद तुरुंगात अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ही शिक्षा देण्यात आली.
पेशावर येथील शाळेवर झालेल्या निर्घृण हत्याकांडात १३२ मुलांचा बळी गेल्यानंतर पाक सरकारने फाशीच्या शिक्षेवरील सहा वर्षाची बंदी उठविली असून , त्यानंतर सहा जिहादींना फाशी देण्यात आलेली आहे.
शुक्रवारी पाक सरकारने अकील उर्फ डॉक्टर उस्मान व अर्शद मोहम्मद या दोघांना फैसलाबाद तुरुंगातच फाशी दिली होती.
डॉ. उस्मान हे नाव वापरणाऱ्या अकीलवर रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्य ठाण्यावर २००९ साली हल्ला केल्याचा तर अर्शदवर माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर २००३ साली प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता.
गुरुवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी फाशीची शिक्षा झालेल्या सहा दहशतवाद्यांसाठी डेथ वॉरंटवर स्वाक्षरी केली होती. पाकिस्तानच्या नवाज शरीफ सरकारने दहशतवाद्यांचा बीमोड करण्याचा निर्धार केला असून , त्याअंतर्गत मृत्युदंडाच्या शिक्षेवरील बंदी उठविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)