फुटबॉल चाहत्यांचा पोलिसांशी संघर्ष; इजिप्तमध्ये ३० ठार
By Admin | Updated: February 9, 2015 23:38 IST2015-02-09T23:38:20+5:302015-02-09T23:38:20+5:30
इजिप्तमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान फुटबॉल चाहते व पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत ३० चाहते ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत

फुटबॉल चाहत्यांचा पोलिसांशी संघर्ष; इजिप्तमध्ये ३० ठार
कैरो : इजिप्तमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान फुटबॉल चाहते व पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत ३० चाहते ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. फुटबॉल सामना सुरू होण्याआधी लोक क्रीडांगणात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न करीत होते. फुटबॉल अत्यंत प्रिय असणाऱ्या या देशातील हा खेळाशी संबंधित सर्वांत वाईट असा हिंसाचार आहे.
गृहमंत्रालयाने यासंदर्भात दिलेल्या निवेदनानुसार कैरो शहरातील एअर डिफेन्स या स्टेडियममध्ये इजिप्त प्रीमिअर लीग क्लोबचा झामालेक व ईएनपीपीआय यांचा सामना सुरू होण्याआधी ही घटना घडली. चकमक सुरू होताच पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी फोडली. व्हाईट नाईट फॅन ग्रुपचे सदस्य क्रीडांगणाबाहेर दंगल करीत होते. झामालेकचे चाहते व्हाईट नाईटस् म्हणून ओळखले जातात. त्यांनी तिकिटे न घेता क्रीडांगणात शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रुधूर सोडल्यानंतर चेंगराचेंगरी होऊन, गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला. वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरी होऊन ३० जण मरण पावले. (वृत्तसंस्था)