‘द फ्लार्इंग हाऊसवाईफ’ कालवश
By Admin | Updated: October 6, 2014 00:06 IST2014-10-06T00:06:37+5:302014-10-06T00:06:37+5:30
आकाशाला गवसणी घालत अवघ्या जगाला प्रदक्षिणा घालणारी गेराल्डीन मॉकने वयाच्या ८८ वर्षी जगाचा निरोप घेतला

‘द फ्लार्इंग हाऊसवाईफ’ कालवश
क्लीव्हलँड (अमेरिका): आकाशाला गवसणी घालत अवघ्या जगाला प्रदक्षिणा घालणारी गेराल्डीन मॉकने वयाच्या ८८ वर्षी जगाचा निरोप घेतला. एक लहानशा विमानातून जगाची सफर करणारी ती पहिली गृहिणी होय.
६० च्या दशकातील मॉकच्या या अनोख्या धाडसाने अवघे जग चकीत तर झाले; शिवाय आकाश मोकळे करून दिले तर महिलाही उंच भरारी घेत यशोशिखर गाठू शकतात, याची खात्रीही तिने आपल्या साहसी कामगिरीतून पटवून देत महिलांना नवे क्षेत्र काबीज करण्याची उभारी दिली. क्विन्सी येथील राहत्या घरी तिने शेवटचा श्वास घेतला, असे तिची बहीण सुसा रिडने सांगितले.
२२ नोव्हेंबर १९२५ रोजी ओहीओ प्रांतातील नेवार्क येथे गेराल्डीन मॉकचा जन्म झाला. तिला ‘ द फ्लार्इंग हाऊसवाईफ’ म्हणून ओळखले जात. तीन मुलांची आई असलेल्या गेराल्डीन मॉकने वयाच्या ३८ व्या वर्षी एकट्याने विमानातून जगाची सफर करण्याचा ‘विडा’ उचलीत १९६२ मध्ये तिने या जगाच्या हवाई सफरीचा बेत आखला.
११ वर्षे जुने असलेल्या ‘सेसना’ या छोटेखानी विमानात तिने आवश्यक ते बदल केले. एकच इंजिन असलेल्या या विमानात तीन अतिरिक्त इंधन टाक्या बसविण्यात आल्या. तसेच आॅटोपायलट प्रणाली आणि विशेष रेडिओ प्रणालीसह हे विमान सज्ज केले.
‘स्पिरीट आॅफ कोलंबस’ असे नावही तिने या विमानाला देऊन ती जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी सज्ज झाली. (वृत्तसंस्था)