चीनमध्ये प्रथमच रोबो बनला पत्रकार
By Admin | Updated: September 14, 2015 01:11 IST2015-09-14T01:11:42+5:302015-09-14T01:11:42+5:30
चीनमध्ये यंत्रमानवाने (रोबो) लिहिलेला पहिला व्यावसायिक अहवाल या आठवड्यात प्रसिद्ध झाला. या वृत्तामुळे स्थानिक पत्रकारांच्या पोटात खड्डा पडला

चीनमध्ये प्रथमच रोबो बनला पत्रकार
बीजिंग : चीनमध्ये यंत्रमानवाने (रोबो) लिहिलेला पहिला व्यावसायिक अहवाल या आठवड्यात प्रसिद्ध झाला. या वृत्तामुळे स्थानिक पत्रकारांच्या पोटात खड्डा पडला तो अशासाठी की सरकारचे नियंत्रण असलेल्या वृत्तसंस्थेतील आपल्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळते की काय या विचारांनी.
हा अहवाल चिनी भाषेत तोही अवघ्या एका मिनिटात ‘ड्रीमरायटर’ असे नाव असलेल्या या रोबोने लिहिला. हा पत्रकार रोबो तयार केला आहे चीनची सोशल मीडिया व गेमिंगमधील बलाढ्य कंपनी टेनसेंटने. या कंपनीला आर्थिक विषयावरील अगदी प्राथमिक स्वरूपाच्या बातम्या मिळवायला अडचणींना तोंड द्यावे लागले होते.
कंपनीने हा ९१६ शब्दांचा कोणतीही चूक नसलेला लेख आपल्या इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिसद्वारे उपलब्ध केला. हा लेख इतका वाचनीय आहे की, तो कोणा व्यक्तीने लिहिलेला नाही, असे तुम्ही सांगूच शकणार नाही, असे ली वेई या बातमीदाराने म्हटल्याचे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने म्हटले. या लेखाचा विषय होता तो चीनमधील आॅगस्टचा ग्राहक किंमत निर्देशांक. या लेखात चीनच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा असेल याच्यावर विश्लेषकांचे भाष्यही घेण्यात आले आहे.