कराचीत बसवर दहशतवाद्यांचा अंदाधूंद गोळीबार, ४१ ठार
By Admin | Updated: May 13, 2015 21:20 IST2015-05-13T11:28:12+5:302015-05-13T21:20:00+5:30
पाकिस्तानमधील कराची येथे बाईकवरुन आलेल्या सहा दहशतवाद्यांनी एक बसवर अंदाधूंद गोळीबार केल्याने ४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

कराचीत बसवर दहशतवाद्यांचा अंदाधूंद गोळीबार, ४१ ठार
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १३ - पाकिस्तानमधील कराची येथे बाईकवरुन आलेल्या सहा दहशतवाद्यांनी एक बसवर अंदाधूंद गोळीबार केल्याने ४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. हल्ल्यानंतर दहशतवादी पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.
कराची येथील सफुरा चौक येथे बाईकवरुन आलेल्या सहा दहशतवाद्यांनी अल अझहर कंपनीच्या बसला थांबवले. यानंतर सर्वात पहिले बसचालकावर गोळी झाडण्यात आली. त्यानंतर बसमधील प्रवाशांवार अंदाधूंद गोळीबार केला गेला. हल्ल्यात ४१ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या बसमधून इस्मायली समुदायाचे नागरिक प्रवास करत होते. तेहरीक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी ९ एमएम पिस्तूलने गोळीबार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही बस इस्मायली समुदायाच्या कराचीस्थित निवासी संकुलाची होती.