गाझात उपासमारी; हवी तातडीची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:55 PM2024-01-16T12:55:43+5:302024-01-16T12:56:08+5:30

इस्रायलने सुरू ठेवलेल्या लष्करी कारवाईमुळे गाझा पट्टीतील नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत.

Famine in Gaza; Urgent help needed | गाझात उपासमारी; हवी तातडीची मदत

गाझात उपासमारी; हवी तातडीची मदत

जेरूसलेम : गाझा पट्टीतील रहिवाशांना आणखी मदतीची तातडीने आवश्यकता आहे. तेथील लोक उपासमारी व विविध आजारांनी ग्रस्त आहेत असे संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारीतील संघटनांनी म्हटले आहे.
इस्रायलने सुरू ठेवलेल्या लष्करी कारवाईमुळे गाझा पट्टीतील नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारीतील संघटना सक्रिय आहेत. मात्र, युद्धामुळे या मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत. हमासचा संपूर्ण नायनाट झाल्याशिवाय लष्करी कारवाई थांबविणार नाही असे इस्रायलने याआधीच स्पष्ट केले आहे.  
युद्धाला १०० दिवस पूर्ण झाले असून, आता इस्रायलने संघर्ष थांबवावा अशी अमेरिकेने केलेली सूचना त्या देशाने मान्य केली नाही. गाझामध्ये इस्रायल व हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत २४ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत.

अमेरिकेच्या युद्धनौकेवर हौथींचा क्षेपणास्त्र हल्ला
येमेनमधील हौथी दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र डागले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हौथींनी रविवारी हा हल्ला केला. मात्र, त्यामुळे अमेरिकेच्या युद्धनौकेचे किती नुकसान झाले हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. इस्रायल-हमास संघर्ष सुरू असतानाच आता अमेरिका व हौथी दहशतवाद्यांमध्येही संघर्ष सुरू झाल्याने हे युद्ध आणखी विस्तारण्याची भीती व्यक्त होत आहे. 
 

Web Title: Famine in Gaza; Urgent help needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.