फेसबुकची शेरील सॅण्डबर्ग म्हणतेय, मुलींनो स्मार्ट-स्टायलिश नव्हे, तर साध्या-सभ्य मुलाशी लग्न करा!
By Admin | Updated: May 6, 2017 15:17 IST2017-05-06T15:12:00+5:302017-05-06T15:17:55+5:30
‘लग्न करायचंच असेल तर चांगला मुलगा पहा! " असं का म्हणताहेत फेसबुकच्या सीओओ शेरील सॅण्डबर्ग.

फेसबुकची शेरील सॅण्डबर्ग म्हणतेय, मुलींनो स्मार्ट-स्टायलिश नव्हे, तर साध्या-सभ्य मुलाशी लग्न करा!
-लोकमत फिचर्स टीम
‘लग्न करायचंच असेल तर चांगला मुलगा पहा! असा सल्ला कुणी टिपीकल आजीबाईनं दिलेला नाही. तर जगण्याची लढाई स्वत:च्या हिमतीवर जगणाऱ्या आणि आयुष्याच्या प्लॅन बीचा जिद्दीनं, आनंदानं स्वीकार करणाऱ्या शेरील सॅण्डबर्गचा हा सल्ला आहे. शेरील सॅण्डबर्ग म्हणजे फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीओओ. फेसबुकच्या आजच्या यशात शेरीलचा वाटा सिंहीणीचा आहेच. शेरील अनेक ठिकाणी मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून बोलते, जगण्याचा एक वेगळा आणि आनंदी दृष्टीकोन जगभरातल्या माणसांशी शेअर करते. अलिकडेच फिनान्शियल टाईम्स वृत्तपत्राला अमेरिकेतच दिलेल्या मुलाखतीत तिनं मोकळेपणानं सांगितलं की मुलींनी लग्नाचा निर्णय घेताना फार काळजीपूर्वक विचार करुन ‘द गुड गाय’ शोधायला हवा.
नात्यात, विशेषत: लग्न करताना एखाद्या मुलीनं काय विचार करायला हवा असा प्रश्न विचारला असता शेरील सांगते, पहायला हवं की हा माणूस चांगला आहे की नाही, जन्मभर आपली सोबत करताना आपल्या आनंदात आनंद मानेल की नाही.’
पण हे ओळखायचं कसं असं विचारलं तर शेरील सांगते, सोपं नाही ते, प्रेमान पडून डेटवर जाणं, गुलूगुलू बोलणं, आणाभाका खाणं सोपंच असतं. पण तुमच्या करिअरविषयी, जगण्याच्या तुमच्या प्रायॉरिटीविषयी कधी बोलणं होतं का? लग्नाचा निर्णय घेताना किंवा त्यासंदर्भात बोलताना स्पष्ट बोला. विचाराच की, बायकोच्या करिअरविषयी तुझं काय मत आहे? आपल्या नात्यातली समानता याविषयाकडे तू कसा बघतोस? सूत्र एकच, ‘विचारा त्याला!’. पुन्हा पुन्हा विचारा, आणि मग एक मत तयार करा. बायकांचं करिअर यशस्वी होताना जोडीदाराची साथ असेल तर कुटूंबासह एक आनंदी वाट आपण चालतो हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे आपण त्याचा अपमान करतोय का, त्याला कसं वाटेल असा विचार न करता बिंधास्त विचारा. त्याला नाहीच रुचले प्रश्न तर तो नाही म्हणेल, चुकीच्या माणसांशी लग्न लागलं नाही याचा आनंदच मानलेला बरा मग!’
प्रेमाबिमात पडताना स्मार्ट, स्टायलिश, हॅण्डसम आणि अॅटिट्यूडवाला मुलगा आवडत असेलही, आवडतोच अनेकींना. मलाही क्वचित आवडत असे एकेकाळी. पण लग्नाचा निर्णय घेताना नाकासमोर चालणारा, सरळमार्गी, कमी अॅटिट्यूडवाला काहीसा नर्ड पण गुड गाय म्हणजेच सभ्य माणूस शोधलेला उत्तम. असा मुलगा शोेधा जो तुमच्या करिअरला सपोर्ट करेल. तुमच्या सुखदु:खात सोबत करेल. सुखी व्हायचं असेल लग्न करुन तर हाच विचार केलेला बरा, असंही शेरील सॅण्डबर्ग आवर्जुन सांगते.
शेरील सॅण्डबर्ग एक यशस्वी करिअर करत असताना, घर आणि नवऱ्याच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ करत घरही सावरत असताना जगण्याचं एक अत्यंत सोपं सूत्र सांगतेय. म्हणतेय, बोला, विचारा, ठरवा आणि मग निर्णय करा!