चोख सुरक्षेसह युरोपात हाय अलर्ट
By Admin | Updated: January 18, 2015 01:55 IST2015-01-18T01:55:55+5:302015-01-18T01:55:55+5:30
पॅरिसमधील गेल्या आठवड्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीत संशयित कट्टरपंथीविरोधात पोलिसांसोबत लष्करानेही धरपकड मोहीम हाती घेतली आहे.

चोख सुरक्षेसह युरोपात हाय अलर्ट
पॅरिस/ब्रुसेल्स : पॅरिसमधील गेल्या आठवड्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीत संशयित कट्टरपंथीविरोधात पोलिसांसोबत लष्करानेही धरपकड मोहीम हाती घेतली आहे. या तीनही देशांत २० संशयितांना ताब्यात घेतले असून या कारवाईच्या पार्श्वभूमीवर युरोपात हाय अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, बेल्जियमच्या सुरक्षा दलाने पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा कट उधळून लावला. शेकडो जवानांना गस्तीसाठी तैनात करून सुरक्षा वाढविली आहे. राजधानी ब्रुसेल्स शहरात ३०० जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच बेल्जियम पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी घालून १३ लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.
फ्रेंच पोलिसांनी शुक्रवारी अशीच कारवाई करीत १२ जणांना ताब्यात घेतले. पॅरिसमधील हल्लेखोरांना मदत दिली काय, याबाबत त्यांची कसून चौकशी केली. जर्मनीने मुख्य ठिकाणावरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे. या इशाऱ्याची दखल घेत बर्लिन शहरातील विविध भागातील ११ घरांवर शुक्रवारी धाड टाकून संशयितांना जेरबंद करण्यात आले. पॅरिसवासी शुक्रवारी दहशतीच्या छायेत होते. वायव्येक डील कोलंबस पोस्ट आॅफिसमध्ये एक बंदूकधारी इसमाने अनेकांना ओलिस ठेवले होते. पोलिसांनी शिताफीने कारवाई करून ओलिसांची सुटका केली. (वृत्तसंस्था)