देशातील तीन मोठ्या देशांमध्ये त्या त्या देशांच्या प्रमुखांविरोधात जनतेत मोठा रोष दिसत आहे. अमेरिकेत गेल्या पंधरवड्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे झालेला विरोध, भारतात कृषी कायद्यांविरोधात मोदी सरकारविरोधात लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. तर तिसरा देश रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात लाखो लोक मॉस्कोच्या रस्त्यांवर उतरले आहेत.
पुतिन सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु झाले असून यामध्ये लाखो लोकांनी भाग घेतला आहे. विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेविरोधात रशियाच्या जवळपास १०० शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून 3000 हून अधिक लोकांना अटक केली आहे. नवेलनी यांच्या पत्नी युलिया यांनीदेखील आंदोलनात भाग घेतला होता. त्य़ांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
रशियाची राजधानी मॉस्कोपासून दूरवर असलेल्या सायबेरिया, सेंट पीटर्सबर्ग पर्यंत लोक रस्त्यांवर उतरले आहेत. या आंदोलकांमध्ये कॉलेज विद्यार्थी ते वरिष्ठ नागरिकांपासून सारे सहभागी झाले आहेत. रशिया देश तुरुंगात बदलला आहे, यामुळे मी आंदोलनात उतरत असल्याचे एका आंदोलक महिलेने सांगितले.