चीनमध्ये ९ हजार भ्रष्टाचारी अधिका-यांना शिक्षा
By Admin | Updated: April 20, 2016 08:49 IST2016-04-20T08:49:42+5:302016-04-20T08:49:42+5:30
भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चीनमध्ये 9361 अधिका-यांना शिक्षा करण्यात आली आहे. पहिल्या तीन महिन्यातील तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे

चीनमध्ये ९ हजार भ्रष्टाचारी अधिका-यांना शिक्षा
>ऑनलाइन लोकमत -
बीजिंग, दि. २० - भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चीनमध्ये 9361 अधिका-यांना शिक्षा करण्यात आली आहे. पहिल्या तीन महिन्यातील तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्षा करण्यात आलेल्यांमध्ये मंत्रीस्तरावरील अधिका-यांचादेखील समावेश आहे. हे अधिकारी 8788 प्रकरणांमध्ये सहभागी होते अशी माहिती मिळाली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या शिस्त तपासणी केंद्रीय आयोगाने अहवालाद्वारे ही माहिती दिली आहे. वेबसाईटवर हा अहवाल टाकण्यात आला आहे.
फक्त मार्च महिन्यात 2701 अधिका-यांवर 2672 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. सर्वात जास्त प्रकरण बेकायदेशीर भत्ते आणि फायदे मिळवण्याची आहेत. सरकारी वाहनांचा खाजगी कामांसाठी वापर करणे, भेटवस्तू आणि पैशांची देवाणघेवाण करणे ही प्रकरणेदेखील यामध्ये सामील आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ३ वर्षापुर्वी सुरु केलेल्या भ्रष्टाचार-विरोधी अभियानाअंतर्गत आतापर्यंत हजारांहून जास्त अधिका-यांवर कारवाई करण्यात आली आहे.