अटलांटिक महासागर: विज्ञानाच्या जगात एक अत्यंत महत्त्वाची आणि विस्मयकारक घटना घडली आहे. अटलांटिक महासागरातील 'लॉस्ट सिटी' जवळ संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकाने पृथ्वीच्या कवचात आतापर्यंतची सर्वात खोल ड्रिलिंग करण्यात यश मिळवले आहे. समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १२६८ मीटर खोलीवर शास्त्रज्ञांना एक विशेष प्रकारचा दगड सापडला असून, तो दिसायला एखाद्या 'हिरव्या संगमरवरा'सारखा आहे.
पृथ्वीचा ८४% भाग हा 'मेंटल' नावाच्या थराने बनलेला आहे. मात्र, पृथ्वीचे वरचे कवच १५ ते २० किमी जाड असल्याने तिथपर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य मानले जाते. शास्त्रज्ञांनी अटलांटिक महासागरातील अशा एका जागेची निवड केली जिथे पृथ्वीचे कवच अत्यंत पातळ आहे. ४७० फूट लांब महाकाय जहाजाच्या साहाय्याने हे उत्खनन करण्यात आले.
हिरवा दगड नक्की काय आहे? ड्रिलिंग दरम्यान शास्त्रज्ञांना 'पेरिडोटाइट' आणि 'गॅब्रो' नावाचे खडक मिळाले आहेत. हे खडक लाखो वर्षांपासून समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात असल्याने त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया झाली आहे. विज्ञानाच्या भाषेत याला 'सर्पेन्टिनायझेशन' म्हणतात. या प्रक्रियेमुळे या खडकांचा रंग बदलून ते हिरव्या संगमरवरासारखे दिसू लागले आहेत.
जीवसृष्टीच्या उत्पत्तीचे गूढ उकलणार?
ज्या ठिकाणी हे ड्रिलिंग झाले, तिथून हायड्रोजन आणि मिथेन सारखे वायू बाहेर पडतात. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात कदाचित अशाच रासायनिक प्रक्रियेतून झाली असावी. या संशोधनामुळे पृथ्वीची अंतर्गत रचना आणि जीवनाचा उगम समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे.