भूकंपग्रस्त नेपाळला ‘भेदभाव’ बाधा!
By Admin | Updated: June 2, 2015 23:12 IST2015-06-02T23:10:13+5:302015-06-02T23:12:16+5:30
भीषण भूकंपाने हादरलेल्या नेपाळला मदत करण्यासाठी जगभरातून शेकडो हात सरसावले आहेत. मात्र, या प्रयत्नांना धक्का पोहोचल्याचे मानवाधिकार

भूकंपग्रस्त नेपाळला ‘भेदभाव’ बाधा!
लंडन : भीषण भूकंपाने हादरलेल्या नेपाळला मदत करण्यासाठी जगभरातून शेकडो हात सरसावले आहेत. मात्र, या प्रयत्नांना धक्का पोहोचल्याचे मानवाधिकार संघटना अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या विधानावरून दिसून येते. नेपाळमधील सरकार आणि सैन्य भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. मात्र, यात राजकारण आणले जात असल्याचे सांगत अॅम्नेस्टीने लिंग, जात आणि वांशिक भेदभाव यामुळे मदत पोहोचवण्यास अनंत अडचणी येत आहेत, असे सुनावले.
लंडन येथे मुख्यालय असलेल्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने यासंदर्भात पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. नेपाळी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भूकंपग्रस्तांना मदत करताना मानवाधिकारांना केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे संचालक (आशिया) रिचर्ड बेनेट यांनी केले.
समता, न्याय व उत्तरदायित्व यांच्या मिलापातून अडचणीत सापडलेल्या नेपाळवासीयांना मदत पोहोचवणे गरजेचे आहे. भेदभावपूर्ण वागणुकीमुळे नेपाळ या संकटातून बाहेर पडण्याऐवजी आणखी अडचणीत सापडेल, असा इशारा संघटनेने दिला. गेल्या २५ एप्रिल रोजी ७.९ तीव्रतेच्या भीषण भूकंपानंतर अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या एका शिष्टमंडळाने नेपाळचा दौरा केला होता. या शिष्टमंडळाला महिला, दलित, स्थानिक वंशाचे लोक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींवरील उपचारात भेदभाव केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून आले. (वृत्तसंस्था)