"चीनला टॅरिफमधून सूट देऊ नका आणि भारतासारख्या कणखर सहकारी देशासोबतचे संबंध बिघडवू नका", अशा शब्दात अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्र संघातील माजी उच्चायुक्त निकी हेली यांनी सुनावले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफमध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर हेली यांनी हे विधान केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये निकी हेली यांनी अमेरिकेच्या उच्चायुक्त म्हणून काम केले आहे. भारतावरील टॅरिफमध्ये वाढ करण्याच्या अध्यक्ष ट्रम्प यांच्या भूमिकेवर त्यांनी स्पष्ट मत मांडले. निकी हेली यांनी चीनला सवलत देण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे.
"चीनला मुभा देऊ नका आणि भारतासोबतचे संबंध बिघडवू नका"
निकी हेली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत अमेरिका-भारत संबंध आणि टॅरिफच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका मांडली.
त्यांनी म्हटलं आहे की, "भारताने रशियाकडून तेल खरेदी करायला नको. पण, चीन, जो आपला (अमेरिकेचा) एक विरोधक आहे आणि रशिया व इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे; त्याला टॅरिफमधून ९० दिवसांची सवलत दिली गेली. चीनला सवलत देऊ नका आणि भारतासारख्या मजबूत सहकाऱ्यासोबतचे संबंध बिघडवू नका."
ट्रम्प आणखी टॅरिफ वाढवण्याच्या भूमिकेत
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच भारताकडून २५ टक्के टॅरिफ वसूल करणार असल्याचे जाहीर केले आहे. पण, ते इतक्यावरच थांबलेले नाहीत. ट्रम्प यांनी आता भारतावरील टॅरिफमध्ये मोठी वाढ करणार असल्याचे म्हटले आहे.
"भारत एक चांगला व्यापारी भागीदार नाहीये. त्यामुळे आम्ही (अमेरिका) त्यांच्यासोबत जास्त व्यापार करत नाही. भारत आमच्यासोबत व्यापार करतो. आम्ही त्यांच्यावर २५ टक्के टॅरिफ लावण्याचे निश्चित केले होते. पण, मला वाटतंय की मी आता पुढील २४ तासांत त्यांच्यावर याच्यापेक्षा जास्त टॅरिफ लावणार आहे", असे ट्रम्प मंगळवारी (५ ऑगस्ट) एका मुलाखतीत म्हणाले आहेत.