भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानी शहरांतील लोक पळून जाऊ लागले आहेत. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भारताच्या तिन्ही दलांनी मिळून पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरु केले आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देखील प्रतिक्रिया आली आहे.
"हे लाजिरवाणे आहे. ओव्हलच्या दारातून चालत असताना आम्हाला याबद्दल कळले. मला वाटते की भूतकाळातील घटनेवरून लोकांना काहीतरी घडणार आहे हे माहित होते. ते खूप काळापासून लढत आहेत. जर तुम्ही विचार केला तर ते अनेक, अनेक दशके आणि शतके लढत आहेत. मला आशा आहे की ते खूप लवकर संपेल.", असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रात्रभर ऑपरेशन 'सिंदूर'वर सतत लक्ष ठेवून होते. एकूण ९ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आणि सर्व हल्ले पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. भारताने दुपारी १२ वाजेपर्यंत एअर इंडियाच्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि रशियासह अनेक देशांमधील त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी भारताने उचललेल्या पावलांची माहिती दिली आणि परिस्थितीची माहिती दिली.
पाकिस्तानने देखील ऑपरेशन सिंदूर' नंतर, इस्लामाबाद आणि लाहोर विमानतळांवर जाणारी सर्व उड्डाणे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहेत. भारतीय हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सकाळी १०:३० वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे.