जगातील सर्वात सुखी आणि शांतताप्रिय देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॉर्वे आणि डेन्मार्कची झोप सध्या उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने आणि आक्रमक पवित्र्याने या दोन्ही देशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला डेन्मार्कला आपली सार्वभौमत्व गमावण्याची भीती वाटत आहे, तर दुसऱ्या बाजूला रशियाच्या सीमेला लागून असलेल्या नॉर्वेने आपल्या नागरिकांना चक्क युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रीनलँडवरून ठिणगी: डेन्मार्कच्या चिंतेत भर
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँड खरेदीचा किंवा त्यावर ताबा मिळवण्याचा मुद्दा उकरून काढला आहे. दावोस येथील बैठकीत बोलताना ट्रम्प यांनी थेट इशारा दिला की, "जर मला ग्रीनलँड मिळाले नाही, तर मी ही गोष्ट कायम लक्षात ठेवीन." ग्रीनलँड सध्या डेन्मार्कचा भाग आहे. या बेटाचे भौगोलिक स्थान अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रशियाकडून अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ला झाला, तर ते ग्रीनलँडच्या मार्गाने अवघ्या २६ मिनिटांत पोहोचू शकते. ट्रम्प यांना या भागावर 'गोल्डन डोम' उभारायचे आहे. या तणावामुळे डेन्मार्कने आता ग्रीनलँडच्या सुरक्षेसाठी आपले सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
नॉर्वेमध्ये युद्धाची तयारी; १३ हजार नागरिकांना पत्र
दुसरीकडे नॉर्वेची अवस्था अधिक बिकट झाली आहे. ट्रम्प यांच्या अनिश्चित धोरणांमुळे नॉर्वेला रशियाकडून धोका वाढण्याची भीती वाटत आहे. नॉर्वे सरकारने आपल्या १३ हजार नागरिकांना पत्रे पाठवून युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. "युद्ध सुरू झाल्यास सरकार तुमचे घर ताब्यात घेऊ शकते," असे धक्कादायक विधान या पत्रात करण्यात आले आहे. नॉर्वेच्या पंतप्रधानांना ट्रम्प यांनी लिहिलेले एक पत्रही सध्या चर्चेत आहे, ज्यात त्यांनी "मला तुमच्याकडून नोबेल मिळाले नाही, त्यामुळे मी आता शांततेसाठी पुढाकार घेणार नाही," असे खोचक विधान केल्याचे समजते.
का महत्त्वाचे आहे ग्रीनलँड?
एक्सिओसच्या अहवालानुसार, ग्रीनलँड हे रशिया आणि अमेरिका यांच्या मध्यभागी आहे. अमेरिकेच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे बेट म्हणजे एक नैसर्गिक ढाल आहे. ट्रम्प यांना हे बेट कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेच्या नियंत्रणाखाली हवे आहे, जेणेकरून रशियाच्या धोक्याला वेळीच रोखता येईल. मात्र, यामुळे डेन्मार्कच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शांतताप्रिय देशांमध्ये अस्वस्थता
दरवर्षी आनंदी देशांच्या यादीत वरच्या क्रमांकावर असणारे हे देश सध्या मानसिक दडपणाखाली आहेत. नॉर्वेने आपल्या जनतेला सांगितले आहे की, 'तिसरे महायुद्ध' कधीही सुरू होऊ शकते, त्यामुळे मानसिकरीत्या तयार राहा. एका बाजूला रशियाचा वाढता प्रभाव आणि दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांचा दबाव, या कात्रीत हे दोन्ही देश अडकले आहेत.
Web Summary : Trump's stance on Greenland has sparked unease in Denmark and Norway. Denmark fears losing sovereignty, while Norway prepares citizens for potential conflict with Russia due to Trump's policies. Greenland's strategic importance fuels the tension.
Web Summary : ग्रीनलैंड पर ट्रंप के रुख से डेनमार्क और नॉर्वे में बेचैनी है। डेनमार्क को संप्रभुता खोने का डर है, जबकि नॉर्वे ट्रंप की नीतियों के कारण रूस के साथ संभावित संघर्ष के लिए नागरिकों को तैयार कर रहा है। ग्रीनलैंड का सामरिक महत्व तनाव को बढ़ाता है।