डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला जबर दणका
By Admin | Updated: May 23, 2017 18:58 IST2017-05-23T16:43:16+5:302017-05-23T18:58:18+5:30
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला मोठा धक्का देणारं पाऊल उचललं आहे. पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचं कर्जात रूपांतर केलं जावं असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला जबर दणका
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 23 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला मोठा धक्का देणारं पाऊल उचललं आहे. पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचं कर्जात रूपांतर केलं जावं असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. व्हाइट हाऊसने याबाबत माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आर्थिक वार्षिक बजेटमध्ये हा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावात पाकिस्तानला अमेरिकेकडून लष्करी सामग्री खरेदी करण्यासाठी देण्यात येणा-या आर्थिक मदतीचं कर्जामध्ये रूपांतर केलं जावं असं म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनाने हा केवळ प्रस्ताव ठेवला असून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार परराष्ट्र मंत्रालयाकडे असणार आहे. ट्रम्प यांनी हे पाऊल विदेशी मदतीचं बजेट कमी करण्याच्या दृष्टीकोनातून उचललं असल्याचं म्हटलं जात आहे जेणेकरून अमेरिकेी सेनेचा वाढता खर्च पूर्ण करण्यास मदत होईल.
अमेरिकेचा हा प्रस्ताव केवळ पाकिस्तानसाठी नसून अनेक देशांसाठी आहे. ज्या देशांना अमेरिकेने लष्करी सामग्रीसाठी मदत केली आहे त्या सर्व देशांच्या आर्थिक मदतीचं कर्जात रूपांतर केलं जावं असा प्रस्ताव आहे.
नवाज शरीफांसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकला सुनावले खडे बोल-
यापुर्वी काल डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणात मुस्लिम देशांच्या नेत्यांना दहशतवादाचा खात्मा करण्याचं आवाहन केलं होतं. या पवित्र धरतीवर दहशतवादाला थारा देऊ नका. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफही उपस्थित होते. दहशतवाद जगामध्ये पसरतोय. दहशतवादाचे जगभरातील जवळपास सर्वच देश बळी आहेत. काही देश दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेपासून भारत आणि रशियासारखे देशही प्रभावित होत आहेत, धर्माच्या नावाखाली चाललेला दहशतवादाचा खेळ आता बंद झाला पाहिजे असं ट्रम्प म्हणाले होते.