नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात पाच जेट विमाने पाडली गेल्याचा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. शिवाय, या देशांतील संघर्ष आपल्या मध्यस्थीमुळे थांबल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा श्रेय लाटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ट्रम्प यांनी या संघर्षाच्या काळात पाच जेट विमाने पाडली गेल्याचे म्हटले आहे. मात्र, ही विमाने नेमकी कुणाची आहेत हे त्यांनी सांगितलेले नाही. दोन्ही देशांच्या झालेल्या नुकसानीचा त्यांनी उल्लेख केला आहे का, अशी विचारणा काँग्रेसने केली.
२४ व्या वेळी ट्रम्प बोलले, हे खळबळजनक : काँग्रेसकाँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांनी भारत-पाकमध्ये मध्यस्थी केल्याचा व जेट विमाने पाडली गेल्याचा दावा २४व्या वेळी केला. अमेरिकेशी व्यापार करार झाला नसता तर युद्ध थांबले नसते का? पाच जेट लढाऊ विमाने पाडली गेल्याचा ट्रम्प यांचा दावाही खळबळजनक असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.
नमस्ते ट्रम्पचे काय? पंतप्रधान मोदी यांनी २०१९ मध्ये ‘हाऊ-डी मोदी’ आणि फेब्रुवारी २०२० मध्ये ‘नमस्ते ट्रम्प’सारख्या आयोजनातून मैत्री दाखवून दिली.आता गेल्या ७० दिवसांपासून ट्रम्प जे काही दावे करीत आहेत त्यावर मोदींनी स्पष्टीकरण द्यायलाच हवे, असे रमेश यांनी म्हटले आहे.
सत्य देशाला कळू द्या : राहुल गांधी यांची मागणीट्रम्प यांनी पाच जेट विमाने पाडली गेल्याचा दावा करून नेमकी कुणाची विमाने पडली हे स्पष्ट केलेले नाही. यातील नेमके सत्य देशाला कळू द्या, हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
राहुल गांधींनी असे विचारले प्रश्नट्रम्प यांच्या पाच विमाने पाडली गेल्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. यावरून राहुल गांधी यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. १. ट्रंप यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा दावा पुन्हा केला?२. ट्रम्प यांनी भारताला व्यापारविषयक धमकी देऊन ही बिनधास्त वक्तव्ये सुरू केली आहेत का?३. ट्रम्प म्हणतात ती पाडली गेलेली पाच विमाने नेमकी कोणत्या देशाची होती हे कळेल का?