अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मागील २७ ऑगस्टपासून अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादले आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर हा दंड लावण्यात आला. ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेनविरोधात हत्यारे खरेदी करण्यासाठी रशियाला आर्थिक मदत करत आहे असा आरोप केला आहे. अमेरिकेच्या या टॅरिफ कारवाईनंतर भारतावर दबाव येईल अशी अपेक्षा ट्रम्प यांना होती. परंतु ट्रम्प यांचे फासे उलटे पडले. रशियाकडून भारताला तेल खरेदीत अतिरिक्त सूट ऑफर केल्याने भारत आणखी तेल खरेदी वाढवण्याची तयारी करत आहे.
भारतावर दबाव फरक पडला नाही
रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अमेरिकेने २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावले, मात्र ट्रम्प यांचा निर्णय त्यांनाच भारी पडत असल्याचे दिसते. अमेरिकेच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता भारत आधीपेक्षा जास्त रशियाकडून तेल खरेदी करण्याची तयारी करत आहे. त्यातच रशियानेही भारतावर खरेदीवर आणखी सूट ऑफर केले आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरमध्ये भारताला रशियाकडून कच्चे तेल प्रति बॅरल ३ ते ४ डॉलर कमी किंमतीत मिळण्याची शक्यता आहे.
रशियाची ही ऑफर टॅरिफ हल्ल्यानंतर चीनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या द्विपक्षीय चर्चेनंतर पुढे आली आहे. विशेष म्हणजे भारत हा रशियाचा केवळ एकमेव खरेदीदार नाही तर जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला चीनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. युक्रेन युद्धानंतर रशियाकडून भारताने मोठ्या प्रमाणात तेलखरेदी सुरू केली आहे.
अमेरिकेच्या टॅरिफनंतरही तेल खरेदी कायम
अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतरही भारताने देश हिताला प्राधान्य देत रशियाकडून तेल खरेदी कायम ठेवत पुतिन यांच्यासोबत संबंध मजबूत बनवले आहेत. ट्रम्प यांनी अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर भारताने २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात सरकारी आणि प्रायव्हेट रिफायनरीसाठी ११.४ मिलियन बॅरेल रशियन तेल आयात केले. रशियाकडून मिळालेल्या ऑफरनंतर पुढील महिन्यापासून भारतात रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीत १०-२० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.