अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्कींसारखीच वागणूक दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना दिली आहे. सिरिल रामाफोसा यांच्यावर ट्रम्प यांनी त्यांच्या देशात होत असलेल्या कथित श्वेत नरसंहाराचा आरोप ठेवला. त्यांना व्हिडीओ दाखविले आणि बातम्यांची कात्रणेही प्रिंट करून दाखविली. व्हाईट हाऊसचे कर्मचारी, दक्षिण आफ्रिकेचे कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासमोर ट्रम्प यांनी रामाफोसा यांना दाखविलेली ही कात्रणे दक्षिण आफ्रिकेची नाही तर दुसऱ्याच देशातील असल्याचे समोर आले आहे.
कांगोमध्ये होत असलेल्या नरसंहाराचे फोटो, व्हिडीओ ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेचे दाखविले आहेत. यामुळे ट्रम्प यांच्यासह व्हाईट हाऊसची नाचक्की झाली असून दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींचा अपमान झाल्याची टीका विरोधक करू लागले आहेत.
रामाफोसा १९ मे रोजी वॉशिंग्टनला पोहोचले होते. आफ्रिका आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले करण्यासाठी ते आले होते. परंतू झाले भलतेच. ट्रम्प यांनी पत्रकारांसमोर रामाफोसा यांचा अपमान करण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांनी अचानक बातम्यांची कात्रणे काढली आणि रामाफोसा यांना वंशवादाच्या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली होती. रामाफोसा यांना काही समजायच्या आत ट्रम्प यांनी बातम्यांची कात्रणे काढून दाखविण्यास सुरुवात केली. यामुळे रामाफोसा यांना काय बोलावे हे कळेना, यामुळे ते शांत बसले. व्हिडिओमध्ये हजारो श्वेतवर्णीय शेतकऱ्यांची थडगी दाखविली. यावर ट्रम्प यांनी तुम्ही बघ्याची भूमिका घेत आहात, असा आरोप केला.
तरीही यावर रामाफोसा यांनी आपण यापूर्वी असे काही पाहिले नाही, मला ठिकाण सांगा असे म्हटले होते. परंतू ते ट्रम्प होते, ते थांबलेच नाहीत. रामाफोसा यांच्यावर भरमसाठ आरोप केले. आता ट्रम्प तोंडघशी पडले आहेत.
ट्रम्पनी दाखवलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट हा रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट होता. रॉयटर्सनेच ट्रम्प यांना उघडे पाडले आहे. 'हे सर्व गोरे शेतकरी आहेत ज्यांना पुरले जात आहे.', असे ट्रम्पनी हा व्हिडीओ दाखवत म्हटले होते. कांगोच्या गोमा शहरात मृतदेहांच्या पिशव्या घेऊन जातानाचा हा ४ फेब्रुवारीचा व्हिडीओ होता, असे रॉयटर्सने म्हटले आहे. रवांडाच्या समर्थित M23 बंडखोरांशी लढताना मृत झालेल्या लोकांचे हे मृतदेह होते.