हिरेजडित नेकलेस लंपास करणाऱ्या मुलीचा शोध
By Admin | Updated: January 25, 2015 01:24 IST2015-01-25T01:24:08+5:302015-01-25T01:24:08+5:30
एका आलिशान ज्वेलरी दुकानातून ४६ लाख अमेरिकी डॉलरचा हिरेजडित नेकलस चोरी गेला असून, १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलीने ही चोरी केल्याचा संशय आहे.

हिरेजडित नेकलेस लंपास करणाऱ्या मुलीचा शोध
हाँगकाँग : एका आलिशान ज्वेलरी दुकानातून ४६ लाख अमेरिकी डॉलरचा हिरेजडित नेकलस चोरी गेला असून, १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलीने ही चोरी केल्याचा संशय आहे. हाँगकांग पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत.
नेकलसच्या चोरीत दोन महिला व एका पुरुषाचाही हात आहे. प्रौढ मंडळी ग्राहक असल्याचे भासवून दागिने निवडत असतानाच मुलीने सर्वांची नजर चुकवून नेकलेस लंपास केला. नेकलेस गहाळ असल्याचे दुकानातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येण्यापूर्वीच चार चोर पसार झाले. या नेकलेसला ३० हिरे जडविलेले असून त्याची किंमत ४६ लाख अमेरिकी डॉलर असल्याचे वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिले आहे. (वृत्तसंस्था)
घटना अशी घडली
तीन प्रौढांनी दुकानात येऊन ते मोठे खरेदीदार असल्याचे भासवून दागिने दाखविण्यास सांगितले. दुकानातील कर्मचारी त्यांना दागिने दाखविण्यात व्यग्र असतानाच मुलीने ड्रॉवरमधून चावी घेऊन कॅबिनेट उघडले व शिताफीने नेकलेस लंपास केला. ही मुलगी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही टोळी अर्धा तास दुकानात होती. मात्र, दुकान कर्मचाऱ्यांना थांगपत्ता लागला नाही. ही टोळी निघून गेल्यानंतर कितीतरी वेळाने नेकलेस गहाळ असल्याचे आढळले.