रशिया आणि युक्रेन यांच्या साधारणपणे गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आणि संपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. रशियावर दबाव आणण्यासाठी नाटो देश युक्रेनला सातत्याने मदत करत आहेत. मात्र आता, युक्रेनचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार असलेल्या जर्मनीचा सूर बदलल्याचे दिसत आहे.
"जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज एका मुलाखतीत म्हणाले, "ही गोष्ट माझी चिंता वाढवते आहे की, आपण युरोपीय लोक, सध्या हे युद्ध (युक्रेन युद्ध) थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर पुरेसा दबाव आणण्याच्या स्थितीत नाही. आपण अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून आहोत. तर दुसऱ्याबाजूला, चीन, भारत, ब्राझील आणि जगातील अनेक देश, रशिया आणि पुतिन यांच्यासोबत उघडपणे उभे राहत असल्याचेही आपण बघत आहोत."
मोदी-पुतिन-जिनपिंग भेटीनंतर, जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांचं विधान - महत्वाचे म्हणजे, चीनच्या तियानजिन शहरात नुकत्याच झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली. या भेटीनंतर आता जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांचे हे विधान आले आहे. यावरून, रशिया, भारत आणि चीनला सोबत बघून 31 देशांचा समूह असलेल्या नाटोचे टेन्शन तर वाढले नसावे ना? असे वाटते.
दरम्यान, चीनमध्ये एससीओ शिखर परिषदेवेळी राष्ट्रपति जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. यावेळी या तीनही नेत्यांनी अमेरिकेच्या वर्तमान भूमिकेसंदर्भात चर्चा केली.