भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव, तरीही दोन्ही देशांमधील व्यापार सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 11:12 AM2019-03-01T11:12:12+5:302019-03-01T11:34:31+5:30

मंगळवार ते शुक्रवार अशा चार दिवशी दोन्ही बाजूंनी सामानाचे ट्रक येतात आणि जातात.

Despite the tension, the Indo-Pak trade continued after terror attack | भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव, तरीही दोन्ही देशांमधील व्यापार सुरूच

भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव, तरीही दोन्ही देशांमधील व्यापार सुरूच

नवी दिल्ली : भारत व पाकिस्तान यांच्यात कमालीचा तणाव असला तरी त्याचा दोन देशांतील व्यापारावर अजिबात परिणाम झाला नाही. भारतातून गुरुवारी ३४ ट्रक पाकिस्तानला गेले, तर पाकमधून १४ ट्रक भारतात आले, अशी माहिती आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात पूंछ भागातील चाकण-दा-बाग येथून हा व्यापार चालतो. सामानांचे ट्रक नियंत्रण रेषा ओलांडून एकमेकांच्या देशात ये-जा करीत असतात. त्यात अजिबात खंड पडलेला नाही. यापूर्वीही दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला, तेव्हा हा व्यापार सुरूच होता.

मंगळवार ते शुक्रवार अशा चार दिवशी दोन्ही बाजूंनी सामानाचे ट्रक येतात आणि जातात. या व्यापारावर गेल्या मंगळवारपासून काहीही परिणाम झालेला नाही. मंगळवारी भारताने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मद’ चे लष्करी तळ उद्ध्वस्त केले, त्या दिवशीही दोन्ही बाजूंनी व्यापार सुरू होता. त्या दिवशी भारतातून ३५ ट्रक पाकिस्तानमध्ये गेले होते, तर पाकिस्तानातून १५ ट्रक भारतात आले होते.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशांमधील तणाव वाढला आहे. तर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून करण्यात आलेल्या कृत्याचा बदला घेण्याची मागणीही करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानसोबत असलेला व्यापार बंद केल्यास त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होईल. त्यामुळे पाकिस्तानचा बदला घेण्याचा हाही उत्तम मार्ग ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या भाषेत सांगायचे तर, आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानला आपल्या सर्व अटी दूर सारून चर्चेला बसवण्यास भाग पाडणे आणि पाकिस्तानची वाटाघाटींची शक्ती काढून घेणे ही भारताच्या चाणक्यांची नीती असावी. कदाचित भावनिक मुद्द्यांमुळे आपण पाकिस्तानशी इतके कडक वागत नाही. पण चाणक्य नीतीनुसार असे वागणे आवश्यक आहे.

पाकिस्तानला शक्य तेवढे कमकुवत करण्याचा प्रयत्न भारत सहज करू शकतो. पाकिस्तानमध्ये विशेष विदेशी गुंतवणूक येत नाही. पाकिस्तानातील अशी गुंतवणूक केवळ २५००-३००० दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. खुद्द पाकिस्तानचे उद्योजक अंतर्गत अव्यवस्थेमुळे बांगलादेशात गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात. अशा पाकिस्तानी उद्योगाला उभे राहण्यास वाव मिळणार नाही, अशी व्यवस्था भारताला करणे शक्य आहे, कारण बांगलादेश हा पाकिस्तानपेक्षा सक्षम असला तरी भारतापेक्षा बराच कमकुवत आहे. त्यामुळे याबाबत बांगलादेशला आपल्या शब्दात ठेवणे शक्य आहे. अमेरिका, रशिया, अफगाणिस्तान या भारताच्या मित्र राष्ट्रांना पाकिस्तान अधिक निर्यात करतो. भारत या देशांशी असलेल्या चांगल्या संबंधांचा वापर करू शकतो. पाकिस्तानची परकीय गंगाजळी केवळ १८ अब्ज डॉलर आहे. त्यामुळे आयात वाढवण्याची आणि निर्यात घटल्याची वेळ आल्यास पाकिस्तानच्या आर्थिक गंगाजळीवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. मात्र, एकीकडे पाकिस्तानचे हे बंद केलं ते बंद केलं, असे राजकीय नेते सांगत आहेत. तर पाकिस्तानचं पाणी बंद करू असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले होते. पण, अद्यापही पाकिस्तानशी व्यापार होतच असल्याचे दिसून येते. 

Web Title: Despite the tension, the Indo-Pak trade continued after terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.