लोकमत न्यूज नेटवर्क, न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर जगभरातील देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावलेल्या आयात शुल्काचीही यादी प्रसिद्ध केली आहे. हे आयात शुल्क १ ऑगस्टपासून लावण्यात येणार होते, पण त्याची अंमलबजावणी आता ७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर गेली आहे.
'समतुल्य आयात शुल्कात आणखी सुधारणा' नावाच्या एका सरकारी आदेशात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील ७० देशांसाठी टॅरिफची घोषणा केली. गुरुवारी जारी केलेल्या या यादीनुसार भारतावर २५ टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. तत्पूर्वी ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती. सोबतच रशियाकडून लष्करी साहित्य आणि कच्च्या तेलाची खरेदी केल्याने अतिरिक्त दंड लावण्याचाही निर्णय घेतला होता.
...तर भारताचा जीडीपी घसरेल : ‘एसअँडपी’
एस अँड पी मार्केट इंटेलिजन्सच्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, जर अमेरिकेने लादलेले २५ टक्के आयात शुल्क सप्टेंबर २०२५ नंतरही कायम राहिले, तर भारताच्या जीडीपीच्या अंदाजात घट होण्याची शक्यता आहे. भारताच्या शेजारी देशांवर कमी कर : ट्रम्प यांनी पाकिस्तानवर लावलेले टॅरिफ कमी करून १९ टक्क्यांवर आणले आहे. पाकिस्तानवर २९ टक्के टॅरिफ होते. बांग्लादेशवरील टॅरिफ देखील ट्रम्पने कमी केला आहे. भारताच्या शेजारी देशांवर कमी कर लावण्याची खेळी ट्रम्प खेळत असल्याचे मानले जात आहे.