काबूल : अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सीरियाचा (इसिस) म्होरक्या अबू सय्यद व अन्य दहशतवादी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेले आहेत. पेंटेगॉनने ही माहिती दिली आहे.अमेरिकेच्या लष्कराकडून अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात विमानातून बॉम्बहल्ला करण्यात आला. याच ठिकाणी इसिसचे मुख्यालय आहे. या हवाई हल्ल्यातच अबू सय्यद मारला गेला आहे. या हल्ल्यात इसिसचे बरेच दहशतवादीही ठार झाले आहेत. इराक व सीरियामधील इसिसची पकड सैल झाली आहे. त्यामुळेच इसिस अफगाणिस्तान विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अबू सय्यदचा खात्मा हा इसिसला धक्का असून, त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये स्थिती मजबूत करण्यात स्अडचणी येतील.इसिसमोर केवळ अफगाणिस्तान सरकार आणि अमेरिकन लष्कराचे आव्हान नसून तिथे सक्रिय असलेल्या तालिबानलाही सामोरे जावे लागत आहे. तालिबान व इसिस यांच्यात संघर्ष सुरु असून, त्यात दोन्हीकडील अनेक जण मारले गेले आहेत. अर्थात इसिसची हानी अधिक झाली आहे. अशा स्थितीत तालिबानचा पराभव करून वर्चस्व निर्माण करणे इसिसला वाटते तितके सोपे नाही. (वृत्तसंस्था)
इसिसचा अफगाणप्रमुख अबू सय्यदचा खात्मा
By admin | Updated: July 16, 2017 01:44 IST