ब्रुसेल्स : चेक-इन व बोर्डिंग प्रणालींना लक्ष्य करणाऱ्या सायबर हल्ल्यामुळे युरोपातील काही प्रमुख विमानतळांवरील उड्डाणे शनिवारी विस्कळीत झाली. १९ सप्टेंबरच्या रात्री हा हल्ला झाला. अनेक युरोपीय विमानतळांच्या सेवादाता संस्थांना (सर्व्हिस प्रोव्हायडर) त्यात लक्ष्य करण्यात आले. ब्रसेल्स विमानतळाने म्हटले की, या हल्ल्यामुळे तेथे केवळ हाताने चेक-इन आणि बोर्डिंग शक्य आहे आणि उड्डाणांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होत आहे.
बर्लिन येथील ब्रँडेनबर्ग विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासी हाताळणी प्रणाली पुरवणाऱ्या सेवा दाता कंपनीवर शुक्रवारी संध्याकाळी सायबर हल्ला झाला. त्यामुळे या प्रणालींशी संबंधित कनेक्शन बंद करावे लागले. युरोपमधील सगळ्यात व्यस्त असलेल्या लंडन येथील हीथ्रो विमानतळाने सांगितले की, ‘तांत्रिक समस्ये’मुळे चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टम विस्कळीत झाली आहे.
‘कॉलिन्स एरोस्पेस’ कंपनीची यंत्रणा ठरली सायबर हल्ल्याचे लक्ष्य‘कॉलिन्स एरोस्पेस’ कंपनीची यंत्रणा सायबर हल्ल्याचे लक्ष्य ठरली. २०१८ मध्ये स्थापन झालेली कॉलिन्स ही एक अमेरिकी विमानचालन, संरक्षण तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीच्या प्रणालीत प्रवाशांसाठी थेट चेक-इन करण्याची सोय नसली तरी ती असे तंत्रज्ञान पुरवते ज्याद्वारे प्रवासी स्वतःच चेक-इन करू शकतात, बोर्डिंग पास आणि बॅग टॅग छापू शकतात, आणि त्यांच्या सामानाची तिकीट बुकिंग आणि पाठवणी एका कियोस्कवरून केली जाऊ शकते. कंपनीची ही सेवा हल्ल्यामुळे ठप्प झाली. पॅरिस परिसरातील रोइसी, ऑर्ली व ले बर्जे विमानतळांवर मात्र कोणतीही अडचण नोंदली गेली नाही. दरम्यान, प्रवाशांना प्रवासापूर्वी उड्डाणस्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.