इसिसचे क्रूरकृत्य, गे कैद्यांना गच्चीवरुन खाली फेकले
By Admin | Updated: January 19, 2015 16:30 IST2015-01-19T16:29:37+5:302015-01-19T16:30:19+5:30
इसिसच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहरात समलैंगिक संबंध ठेवणा-या दोघा कैद्यांना इमारतीच्या गच्चीवरुन खाली ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे.

इसिसचे क्रूरकृत्य, गे कैद्यांना गच्चीवरुन खाली फेकले
ऑनलाइन लोकमत
मोसूल (इराक), दि. १९ - इराकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांच्या क्रूरकृत्य सुरुच असून इसिसच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहरात समलैंगिक संबंध ठेवणा-या दोघा कैद्यांना इमारतीच्या गच्चीवरुन खाली ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही शिक्षा भर चौकात देण्यात आली आहे.
शरियत कायद्यानुसार समलैंगिक संबंध ठेवणे गुन्हा आहे. इसिसच्या दहशतवाद्यांनी या गुन्ह्यासाठी दोघा जणांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. मोसूलमधील तुरुंगात समलैंगिक संबंध ठेवणा-या दोघा कैद्यांना इसिसच्या दहशतवाद्यांनी १०० फूट उंचीवरुन खाली फेकून दिले. इसिसने या घटनेचे छायाचित्र आणि व्हिडीओ ऑनलाइन टाकले आहे. या छायाचित्रांमध्ये डोळ्यावर पट्टी आणि हात बांधलेल्या दोघा जणांना इसिसचे दहशतवादी गच्चीवरुन खाली ढकलत असल्याचे दिसते. तर विवाहबाह्य संबंध ठेवल्याप्रकरणी इसिसच्या दहशतवाद्यांनी एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचा व्हिडीओही जाहीर केला आहे.