न्यूयॉर्क : अमेरिकेमध्ये होणाऱ्या हिंसक घटनांना तेथील नागरिकही कंटाळले आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेने दिलेल्या प्रस्तावानुसार, अमेरिकेतील ४० विद्यापीठांमध्ये जैन धर्मावर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यात जैन धर्मावर विद्यार्थ्यांना पीएच. डी. करता येईल तसेच अहिंसेचे तत्त्व, तसेच सात्त्विक आहार यांच्यावर विशेष कोर्सेस असतील.
अमेरिकेतील विस्काॅन्सिन विद्यापीठ, कनेक्टिकट विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ, कॅरिटॉस कम्युनिटी कॉलेज, फ्लोरिडा विद्यापीठ आदी ४० विद्यापीठांमध्ये जैन धर्माबद्दलचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. अमेरिकेशिवाय इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, आशियातील अन्य देशांतील विद्यापीठांतही जैन धर्मावरील अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे.
फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुलेख जैन यांनी सांगितले की, सध्या अहिंसा, सात्त्विक आहार आदी शब्दांचा वापर अमेरिकेसह अनेक देशांत वाढला आहे. या संकल्पना समजावून घेण्याची, त्यानुसार आचरण करण्याची अनेकांनी तयारी दाखविली आहे. या दोन तत्त्वांचा जैन धर्म गेल्या काही हजार वर्षांपासून प्रचार करत आहे.
त्यामुळे जैन धर्माची लोकांना अधिकाधिक माहिती व्हावी म्हणून त्याचे अभ्यासक्रम विविध विद्यापीठात सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अमेरिका, कॅनडामध्ये सुमारे दीड लाख जैनधर्मीय राहतात. त्यांच्याकडून अशा प्रकल्पासाठी देणग्या मिळतात. त्यातून जैन धर्मावर सखोल संशोधन केले जाते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात.
४५० कोटी रुपयांचा प्रकल्प
- अमेरिका व अन्य देशांच्या विद्यापीठांमध्ये जैन धर्माचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा हा प्रकल्प ४५० कोटी रुपयांचा आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी लागणारे १५० कोटी रुपये फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेने देणग्यांद्वारे मिळविले आहेत.
- शिकागोमध्ये राहणारे व मूळ गुजरातचे रहिवासी असलेले डॉ. जसवंत मोदी यांनी या कामासाठी ९५ कोटी रुपये दिले. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च होतील.
...तर सहिष्णू समाजाची निर्मिती शक्यअहिंसा शब्द आधुनिक समाज आणि लोकशाही यांचा मूळ आधार आहे. अनेक शतकांपासून तो जैन धर्माच्या विचारसरणीत आहे. जर आम्ही अहिंसेचे विचार माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक आणि पदवी स्तरावर विद्यार्थ्यांना शिकविले तर आम्ही अशा समाजाची निर्मिती करु शकतो जो समाज अधिक सहिष्णु असेल. - डॉ. सुलेख जैन, अध्यक्ष, जैना.