CoronaVirus News: एक छदामसुद्धा देणार नाही; ८० लाख निकृष्ट मास्क पाठवणाऱ्या चीनविरोधात 'या' पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 10:01 IST2020-05-12T09:55:03+5:302020-05-12T10:01:29+5:30
चीनकडून पुन्हा दुय्यम दर्जाच्या मास्कचा पुरवठा; १ कोटी १० लाखपैकी ८० लाख मास्क निकृष्ट

CoronaVirus News: एक छदामसुद्धा देणार नाही; ८० लाख निकृष्ट मास्क पाठवणाऱ्या चीनविरोधात 'या' पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा
ओटावा: चीनमधून कोरोनाचा झालेला प्रसार, त्याबद्दलची माहिती जगाला देण्यास चीननं केलेला उशीर यामुळे चीनबद्दल संशयाचं वातावरण आहे. त्यातच आता चीन अनेक देशांना पुरवत असलेलं वैद्यकीय साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याची माहिती समोर येत असल्यानं संशय आणखी वाढू लागला आहे. युरोपियन देशांपाठोपाठ आता चीननं कॅनडाला निकृष्ट दर्जाचे मास्क पाठवले आहेत. मात्र या मास्कचे पैसे आम्ही देणार नसल्याचं म्हणत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडोंनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी कॅनडा सरकारनं चीनकडून १ कोटी १० लाख मास्क मागवले होते. मात्र यातले केवळ १० लाख मास्क चांगल्या दर्जाचे असल्याचं आढळून आलं. तर १६ लाख मास्कची चाचणी अद्याप सुरू आहे. निकृष्ट दर्जाच्या मास्कचे पैसे कॅनडा देणार नसल्याचं त्रुडोंनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं. 'कॅनडा निकृष्ट दर्जाच्या पीपीईंचे पैसे देणार नाही. आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाचे मास्क हवेत,' असं त्रुडो म्हणाले.
चीनकडून आलेले दुय्यम दर्जाचे मास्क आणि त्यावर कॅनडावर दिलेली प्रतिक्रिया यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. याआधी २०१८ मध्ये चिनी कंपनी हुवेईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कॅनडाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्हॅन्कुवरमध्ये अटक केली. प्रत्युत्तरादाखल चिनी अधिकाऱ्यांनी कॅनडाच्या दोन दुतांविरोधात अटकेची कारवाई केली. त्यामुळे दोन देशांच्या संबंधांमध्ये कटुता आली. त्यात आता मास्क प्रकरणामुळे भर पडली आहे.
त्याआधी तैवाननं ५ लाख मास्क देणगी स्वरुपात कॅनडाला दिले होते. तैवानच्या या मदतीचं त्रुडोंनी कौतुक केलं होतं. त्यामुळे चीन नाराज झाला. अमेरिका आणि जपान नेतृत्त्व करत असलेल्या राष्ट्रगटांमध्ये कॅनडाचाही समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये तैवानला निरीक्षक म्हणून संधी मिळावी, अशी भूमिका कॅनडानं मांडली होती. मात्र चीननं त्याला कडाडून विरोध केला. तैवान स्वतंत्र राष्ट्र नसल्याचं चीन मानतो. त्यामुळे त्यांना राष्ट्रगटात संधी देण्याचा प्रश्नच येत नसल्याची चीनची भूमिका आहे.
देशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता; पण आता बरंच काही बदलणार?
आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाल
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा
चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप