Coronavirus: अमेरिकेत ८० ते ९० हजार मृत्यूंचा ट्रम्प यांचा सुधारित अंदाज; तरीही कामगिरीवर समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 10:55 PM2020-05-04T22:55:13+5:302020-05-05T06:51:33+5:30

पूर्वी वर्तवली होती ५० ते ६० हजार मृत्यूंची शक्यता

Coronavirus: Trump's revised estimate of 80,000 to 90,000 deaths in US; Still satisfied with the performance | Coronavirus: अमेरिकेत ८० ते ९० हजार मृत्यूंचा ट्रम्प यांचा सुधारित अंदाज; तरीही कामगिरीवर समाधानी

Coronavirus: अमेरिकेत ८० ते ९० हजार मृत्यूंचा ट्रम्प यांचा सुधारित अंदाज; तरीही कामगिरीवर समाधानी

googlenewsNext

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात पसरलेल्या ‘कोविड-१९’ या महामारीमुळे अमेरिकेत ८० ते ९० हजार मृत्यू होऊ शकतात, असा सुधारित अंदाज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी वर्तवला.

व्हाईट हाऊसमध्ये दोन आठवड्यांपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी या महाभयंकर आजारामुळे ५० ते ६० हजार अमेरिकन नागरिक मृत्यूमुखी पडतील, असा अंदाज वर्तवला होता. आता ट्रम्प यांनी मात्र एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त मृत्यू होऊ शकतात, असे नमूद केले. असे असले, तरी आपल्या कामगिरीवर समाधान व्यक्त करीत अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात अपेक्षित यश आल्याचा दावा त्यांनी केला. अमेरिकेत आजघडीला सुमारे ६९ हजार नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू
झाला आहे.

ट्रम्प म्हणाले, ‘‘जगभर कोरोना विषाणूच्या संसर्गाचा स्फोट झाला असताना अमेरिकेत ही संकटाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यात आली. यामुळे येथे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात असेल. एकूण ८० ते ९० हजार नागरिक या आजारामुळे दगावले, तरी आमच्या लेखी हे यश असेल. मात्र, या विषाणूविरोधातील आपली लढाई संपलेली नाही.’’

सुधारित मृत्यूसंख्येच्या अंदाजाबाबत अधिक विचारल्यावर ट्रम्प यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले. ‘‘६५ हजारांच्या आसपास नागरिकांचा मृत्यू होईल, असे पूर्वी मला वाटले होते; पण सध्या संसर्गाचा वेग पाहता ही संख्या ८० ते ९० हजारांच्या घरात जाऊ शकते. तुम्ही याकडे कसे बघता, हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही; पण लॉकडाऊन लागू केले, तरी देशातील कुठल्या ना कुठल्या भागात मृत्यू होतीलच,’’ असे ते म्हणाले.

मार्चमध्ये सांगितला होता एक लाखाचा आकडा...
1) अशा प्रकारे अमेरिकेतील मृतांच्या आकड्याचा अंदाज वर्तवण्याची ट्रम्प यांची ही काही पहिली वेळ नाही. सर्वप्रथम मार्च महिन्याच्या अखेरीस त्यांनी किमान एक लाखाचा आकडा सांगितला होता. ‘‘एक लाखापेक्षा कमी-जास्त मृत्यू झाले, तरी आम्ही चांगली कामगिरी बजावली, असेच मी म्हणेन,’’ असे विचित्र विधान ट्रम्प यांनी तेव्हा केले होते. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी हे विधान केले तेव्हा अमेरिकेत केवळ ३ हजार ९०० च्या घरात रुग्ण दगावले होते. यामुळे त्यांच्या या आकडेबाजीची जगभरात चर्चा झाली होती.

2) ट्रम्प यांचा हा आकड्यांचा खेळ सुरू असतानाच व्हाईट हाऊसमधील ‘कोरोना व्हायरस टास्क फोर्स’चे अधिकारी डॉ. डेबॉर ब्रिक्स यांनीदेखील अलीकडे एका वेगळ्या आकड्याची भर घातली. त्यांच्या मते, ‘कोविड-१९’मुळे अमेरिकेत १ लाख ते २.४० लाखांदरम्यान मृत्यू होऊ शकतात, असा अंदाज आम्हाला आधीपासून आहे.

वर्षाअखेरपर्यंत लस तयार करणार : ट्रम्प
कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लस अमेरिका या वर्षाच्या अखेरीपर्यंत शोधून काढेल, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे अमेरिकेतील रुग्णांची संख्या ११ लाखांपेक्षा अधिक झाली असून, सुमारे ६९ हजार लोकांचा बळी गेला आहे. या साथीमुळे अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये विविध प्रकारची बंधने लादण्यात आली आहेत. नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, कोरोना साथीला रोखण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. सध्या बंद असलेल्या शाळा व विद्यापीठे सप्टेंबरपासून पुन्हा सुरू व्हायला हवीत. प्रतिबंधक लस सर्वात प्रथम कोण तयार करतो, अशी चुरस जगातील काही देशांमध्ये सध्या लागलेली आहे. यासंदर्भात, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘‘ही लस शोधून काढण्यात जगातील कोणत्याही देशाने अमेरिकेतील शास्त्रज्ञांवर मात केली, तरी त्याचे आम्ही स्वागतच करू. अशी लस शोधून काढल्यास साºया जगालाच फायदा होणार आहे.’’

सर्व काळजी घेऊनच प्रयोग सुरू
अमेरिकेत विषाणू प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी माणसांवर चाचण्या सुरू आहेत. या प्रयोगांमुळे या माणसांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प म्हणाले, या चाचण्या करून घेणाऱ्यांना त्यांच्यावर करण्यात येणाºया प्रयोगांची पूर्ण कल्पना आहे; तसेच प्रयोग करताना शास्त्रज्ञ सर्व प्रकारची काळजी घेत आहेत.

Web Title: Coronavirus: Trump's revised estimate of 80,000 to 90,000 deaths in US; Still satisfied with the performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.