कोरोना व्हायरसच्या संकटावर चीनने मात केल्याची चर्चा आहे. चीनमध्ये तीन महिने लॉकडाऊन करण्यात आला होता. तब्बल तीन महिन्यांनंतर चीनने लॉकडाऊन उठवत आता कुठे मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे रुग्ण आता तिथे नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून चीन आता कोरोनामुक्त झाल्याचे बोलले जाते. लॉकडाऊन हटवल्यानंतर तेथील जनजीवन आता पूर्ववत होत आहे. सावधानता बाळगत शाळा, सार्वजनिक वाहतूक, थिएटर, सुपरमार्केट सुरू करण्यात आली आहेत.
याचपाठोपाठ तीन महिने बंद असलेला शांघाईमधील जगविख्यात थीमपार्क वॉल्ट डिस्नेलँड पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनापासून बचावासाठी वॉल्ट डिस्नेने शांघाय डिस्नेलँड पार्कमधील कर्मचार्यांसाठी काही उपाययोजना राबवल्या असून, ज्यात सोशल डिस्टंस पाळणे, सॅनिटाइज करणे, मास्क लावणे आणि स्क्रीनिंग करणे अशा नियमाचे कडक पालन करणे बंधनकारक आहे. चीन सरकारने विनंती केली आहे की, या उद्यानात 24,000पेक्षा कमी लोकांनाच एन्ट्री देण्यात यावी. तसेच फक्त 30% पर्यटकांना एन्ट्री दिली जावी, असे सांगण्यात आले आहे.
चीनमध्ये मोठ्या संख्येत शाळा सुरू झाल्या आहेत. मुले मास्क घालून येत आहेत. वर्गात जाण्याचे निश्चित मार्ग आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांची फजिती होणार नाही. अनेक शाळांमध्ये मोफत मास्क दिले जात आहेत आणि एका वर्गात ३०पेक्षा जास्त मुलांना बसवत नाहीत. दिवसात तीन वेळा मुलांचा ताप मोजला जातो. शाळेत येणाऱ्या शिक्षकांच्या प्रकृतीचीही रोज तपासणी होते. कॅन्टीन व वर्गांना अनेकदा सॅनिटाइज केले जात आहे. स्कूल बस अशा बनवण्यात आल्या आहेत की, मुलांमध्ये संपर्क कमी येईल आणि ते संसर्गापासून वाचतील.