CoronaVirus News: Oxford's Corona Lashi had 50 percent success | CoronaVirus News: ऑक्सफर्डच्या कोरोना लशीला आले ५० टक्के यश

CoronaVirus News: ऑक्सफर्डच्या कोरोना लशीला आले ५० टक्के यश

लंडन : ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिट्यूटतर्फे विकसित करण्यात येत असलेली व सध्या मानवी चाचण्या सुरू असलेली कोरोना विषाणूविरोधी लस यशस्वी होण्याची शक्यता ५० टक्के आहे, असे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अ‍ॅड्रियन हिल यांनी म्हटले आहे.

‘इंडिपेंडंट’ या लंडनमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राशी बोलताना डॉ. हिल म्हणाले की, आम्ही तयार करीत असलेल्या लसीच्या एक हजार मानवी स्वयंसेवकांवर चाचण्या घेतल्या जात आहेत; परंतु एकूणच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाला खूपच उतरती कळा लागली असल्याने आमच्या चाचण्यांची यशस्वीता समाधानकारकपणे तपासता येण्याची शक्यता सध्या तरी फक्त ५० टक्के दिसते आहे. त्यामुळे ओसरत चाललेली साथ व वेळ यांच्याशी आम्हाला स्पर्धा करावी लागणार आहे.

कोरोनाविरुद्ध लस विकसित करण्याच्या जगभरात सुरू असलेल्या अनेक प्रयत्नांमध्ये आॅक्सफर्ड विद्यापीठाचा हा प्रकल्प खूप आशादायी मानला जात आहे. चाचण्या यशस्वी झाल्या, तर अ‍ॅस्ट्रा झेनेका या ब्रिटिश औषध उत्पादक कंपनीकडून या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून घेण्याची योजना आहे. (वृत्तसंस्था)

वुहानच्या इन्स्टिट्यूटमध्ये विषाणू नव्हता

वुहान : वटवाघळांमध्ये सापडणारे कोरोनाचे तीन विषाणू वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजीमध्ये जपून ठेवले आहेत. मात्र, त्या विषाणूंचे कोविड-१९ विषाणूशी काहीही साधर्म्य नाही, असा दावा या संस्थेच्या संचालिका वांग यानयी यांनी केला आहे.

चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातून कोरोनाची साथ पसरून तिने साºया जगात हाहाकार माजविला आहे. या साथीचा कोविड-१९ हा विषाणू चीनने वुहानमधील प्रयोगशाळेत तयार केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. त्यासंदर्भातील अनेक पुरावे आपल्याकडे असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. मात्र, हे दावे चीनने याआधीच फेटाळून लावले आहेत. कोरोना साथीमुळे अमेरिकेसह अनेक देशांत प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे चीनने नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी काही देशांनी केली.

वुहानमधून कोरोनाची साथ जगभर कशी पसरली, याची सखोल चौकशी काही देशांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजीच्या संचालक वांग यानयी म्हणाल्या की, कोविड-१९ हा विषाणू आमच्या संस्थेतून वातावरणात मिसळला असावा, हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच इतरांनी केलेला आरोप चुकीचा आहे. वटवाघळातून कोविड-१९ चा विषाणू माणसात संक्रमित झाला असावा, असेही काही शास्त्रज्ञांना वाटते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Oxford's Corona Lashi had 50 percent success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.