लावणी धरणार चीनमध्ये ठेका
By Admin | Updated: June 23, 2014 04:15 IST2014-06-23T04:15:52+5:302014-06-23T04:15:52+5:30
महाराष्ट्राच्या पारंपरिक लावणीला चीनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान प्रथमच मिळाला आहे.

लावणी धरणार चीनमध्ये ठेका
बाळासाहेब बोचरे, सोलापूर
महाराष्ट्राच्या पारंपरिक लावणीला चीनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान प्रथमच मिळाला आहे. लावणीसह वाघ्या-मुरळी या पारंपरिक कलाही तेथे सादर करण्यात येणार आहेत. चीनच्या शेडाँग प्रांतात क्विन्डाओ शहरात २४ ते २७ जूनदरम्यान आंतरराष्ट्रीय कला महोत्सव होणार आहे. चीनसह फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, बाली, अमेरिका, हाँगकाँगचे कलाकार सहभागी होतील. महोत्सवात भारतीय कला सादर करण्याचे निमंत्रण चीन सरकारतर्फे मुंबईच्या लोकरंग सांस्कृतिक मंचला मिळाले आहे. लोकरंग सांस्कृतिक मंचचे संस्थापक आणि लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे महोत्सवात व्याख्यानही देणार
आहेत. मोडनिंब (ता. माढा ) येथील प्रमिला लोदगेकर, छाया व माया खुटेगावकर, रेश्मा व वर्षा परितेकर लावणी सादर करतील. लावणीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय लोककलेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, हा मोठा सन्मान आहे, असे लोकरंग सांस्कृतिक मंच, मुंबई प्रकाश खांडगे यांनी सांगितले.