युद्ध, युद्धजन्य परिस्थिती, बेकारी, बेरोजगारी, महागाई, सुरक्षितता, तणाव.. इत्यादी कारणांमुळे जगभरात स्थलांतरितांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. अशा परिस्थितीला मुख्यत्वे बळी पडतात ते गरीब आणि सर्वसामान्य लोक. जगणं अवघड झाल्यामुळे त्यांना स्थलांतर करावं लागतं; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्थलांतरितांमध्ये केवळ गरीब लोकच असतात, असं नाही, उलट अलीकडचे अनेक अभ्यास सांगतात, स्वेच्छेनं आपल्या देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करणाऱ्यांत श्रीमंतांचं प्रमाण बरंच मोठं आहे.
अर्थातच गरिबी हे त्याचं कारण नाही, तर राजकारण आणि करांचा मोठा बोजा... या कारणानं श्रीमंत लोक आपला देश सोडताहेत. ज्या देशांमध्ये उद्योग, व्यापारासाठी सरकारनं आकर्षक धोरणं राबवली आहेत, ज्या ठिकाणी करांचा बोजा कमी आहे आणि उद्योजकांसाठी नवनव्या योजना आखल्या आहेत, अशा देशांमध्ये हे श्रीमंत लोक स्थलांतर करीत आहेत.
तंत्रज्ञानानं श्रीमंतांना ‘जिथं हवं तिथं राहायचं’ स्वातंत्र्य दिलं आहे. तंत्रज्ञानानं श्रीमंतांसाठी जग खुलं मैदान बनवलं आहे. त्यामुळेच कंपनी सिंगापूरमध्ये, कुटुंब इटलीमध्ये आणि संपत्ती दुबईमध्ये असा पर्याय त्यांनी स्वीकारला आहे!
राजकारण आणि करांमुळे त्रस्त झालेले अब्जाधीश आता स्वतःचा देश सोडत आहेत. ब्रिटन, अमेरिकेपासून अनेकांचा मोहभंग झाला आहे. त्यामुळे इटली, पोर्तुगाल आणि सिंगापूरसारख्या ठिकाणांना त्यांनी आता आपलं ‘घर’ बनवलं आहे. दक्षिण युरोप व आशियाकडे अब्जाधीशांचा कल वाढतो आहे. याच कारणानं २०१८मध्ये सव्वा लाख आणि २०२५ मध्ये दीड लाख अब्जाधीशांनी आपला देश सोडला.
जगातील सर्वांत श्रीमंत कुटुंबांमध्ये सध्या स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होण्याची लाटच सुरू आहे. तज्ज्ञ याला इतिहासातील ‘सर्वांत मोठं खासगी संपत्ती स्थलांतर’ म्हणत आहेत.
श्रीमंत लोक स्वतःची संपत्ती वाचवण्यासाठी, आपल्या पुढील पिढ्यांच्या सुरक्षितततेसाठी आणि राजकीय अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी ‘गोल्डन व्हिसा’ तसेच परदेशी नागरिकत्वाचा आधार घेत आहेत. स्विस बँक यूबीएसनं आपल्या अब्जाधीश ग्राहकांचं सर्वेक्षण केलं. त्यात आढळलं की, २०२५ मध्ये ३६ टक्के अब्जाधीशांनी किमान एकदा तरी आपलं निवासस्थान बदललं आहे, तर नऊ टक्के इतर अब्जाधीश स्थलांतराच्या तयारीत आहेत किंवा त्याबाबत गंभीरपणे विचार करीत आहेत. विशेषतः ५४ वर्षांखालील ४४ टक्के तरुण अब्जाधीश गेल्या वर्षी दुसऱ्या देशात स्थलांतरित झाले आहेत.
गुंतवणूक स्थलांतर फर्म ‘हेनली अँड पार्टनर्स’कडे वर्षागणिक अर्जांमध्ये २८ टक्क्यांची मोठी वाढ नोंदली गेली आहे. हेनली अँड पार्टनर्सच्या ‘प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट’नुसार दरवर्षी अब्जाधीश स्थलांतरितांची संख्या वाढतेच आहे. यंदा २०२६ मध्ये ही संख्या अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
इटलीमध्ये नव्या रहिवाशांसाठी दोन लाख युरो वार्षिक फ्लॅट टॅक्स योजना १५ वर्षांपर्यंत परदेशी उत्पन्नावरील कर मर्यादित करते. ही योजना श्रीमंतांसाठी आकर्षक ठरली आहे. पोर्तुगालनं ‘गोल्डन व्हिसा’ आणि नव्या योजनेअंतर्गत २० टक्के करसवलत देऊन श्रीमंत स्थलांतरितांना आकर्षित केलं आहे. सिंगापूरनंही अशाच प्रकारच्या अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. हेनली रिपोर्टनुसार २०२५ मध्ये इटलीमध्ये ३,६००, पोर्तुगालमध्ये १,४०० आणि ग्रीसमध्ये १,२०० नवे अब्जाधीश स्थायिक झाले आहेत.
Web Summary : Driven by politics, taxes, and the allure of favorable policies, the wealthy are increasingly leaving their home countries. Tech enables this global lifestyle, with destinations like Italy, Portugal, and Singapore becoming new havens. Experts call it a historic wealth migration.
Web Summary : राजनीति, करों और अनुकूल नीतियों के आकर्षण से प्रेरित होकर, अमीर लोग तेजी से अपने देश छोड़ रहे हैं। तकनीक इस वैश्विक जीवनशैली को सक्षम बनाती है, इटली, पुर्तगाल और सिंगापुर जैसे गंतव्य नए स्वर्ग बन रहे हैं। विशेषज्ञ इसे ऐतिहासिक धन प्रवासन कहते हैं।