गेल्या काही दशकांत सतत भारताशी युद्ध करून सतत हरणाऱ्या पाकिस्तानवर नव्या युद्धाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताविरोधात दहशतवादाला पोसून आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला त्यांनीच पाळलेला अस्तनीतला साप डसू लागला आहे. अमेरिकेला या सापाचे तोंड ठेचता आले नाही त्याला संपविण्यासाठी पाकिस्तान युद्ध पुकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने अफगाणिस्तानचे दहशतवादी हल्ले करत आहेत. जे पाकिस्तानने भारतासोबत केले तेच आता त्यांच्यासोबत होऊ लागले आहे. अफगानिस्तानचे दहशतवादी पाकिस्तानचे एकामागोमाग एक लचके तोडू लागले आहेत. यामुळे पाकिस्तानला आता तालिबानशी युद्ध करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पाकिस्तानने अमेरिका अफगानिस्तान सोडून जात असताना तालिबानी दहशतवाद्यांना शरण दिली होती, ट्रेन केले होते आणि त्यांना पुन्हा अफगानिस्तानमध्ये घुसविले होते.
अफगानिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आता हेच दहशतवादी पुन्हा पाकिस्तान सीमेवर आले आहेत. पाकिस्तानचे पत्रकार आणि विश्लेषक सुहेल वराइच यांनी पाकिस्तान एका नव्या युद्धाच्या दिशेने जात असल्याचे म्हटले आहे. याचा भौगोलिक आणि राजनितीक परिणाम होणार असल्याचाही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
पाकिस्तानचा इतिहास हा युद्ध आणि संघर्षांनी भरलेला आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने सहा युद्ध लढली आहेत. तसेच अनेक सीक्रेट युद्धांत सहभागी झाला आहे. पाकिस्तानच्या सीमा या भारत, अफगानिस्तान, इराण आणि चीनला लागून आहेत. चीन सोडला तर उर्वरित सर्व देशांसोबत काही ना काही वाद सुरु आहेत. भारताविरोधातच पाकिस्तानने चार युद्धे लढली आहेत, असे ते म्हणाले.
''भारताशी युद्ध करून चांगले केले'' पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतासोबत युद्धे आवश्यक होती. जर पाकिस्तानने लढाई केली नसती तर नेपाळ आणि भूतानप्रमाणे ते भारतासमोर शरण गेले असते. या युद्धांनी हे सिद्ध केले की पाकिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि भारतासारख्या मोठ्या देशासमोर झुकणार नाही. भारतासोबत मिळते जुळते घेतले असते तर पाकिस्तानमध्ये शांतता आणि आर्थिक विकास होऊ शकला असता, परंतु त्याची किंमत काश्मीर मुद्द्यावरील आपली भूमिका सोडून देणे ही होती, असेही ते म्हणाले.