कृष्णवर्णीय तरुणाची हत्या करणा-या पोलिसाला क्लीन चिट, अमेरिकेत हिंसक आंदोलन
By Admin | Updated: November 25, 2014 15:58 IST2014-11-25T15:47:59+5:302014-11-25T15:58:01+5:30
अमेरिकेतील फर्गसन येथे १८ वर्षाच्या कृष्णवर्णीय तरुणाच्या हत्येप्रकरणी ग्रॅंड ज्यूरींनी पोलिस अधिका-याविरोधात खटला चालवण्यास नकार दिल्याने अमेरिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे.

कृष्णवर्णीय तरुणाची हत्या करणा-या पोलिसाला क्लीन चिट, अमेरिकेत हिंसक आंदोलन
ऑनलाइन लोकमत
फर्गसन, दि. २५ - अमेरिकेतील फर्गसन येथे १८ वर्षाच्या कृष्णवर्णीय तरुणाच्या हत्येप्रकरणी ग्रॅंड ज्यूरींनी पोलिस अधिका-याविरोधात खटला चालवण्यास नकार दिल्याने अमेरिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. फर्गसन येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरून पोलिसांविरोधात तीव्र आंदोलन करत असून तिथे पुन्हा एकदा दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऑगस्टमध्ये फर्गसन येथे १८ वर्षाच्या मायकेल ब्राउन या आफ्रिकी - अमेरिकी तरुणाची डॅरेन विल्सन या श्वेतवर्णीय पोलिस अधिका-याने गोळी झाडून हत्या केली होती. मायकल रस्त्यावरुन जात असताना डॅरेन विल्सनने त्याला हटकले, यानंतर त्यांच्यामध्ये बोलाचालीही झाली. यादरम्यान डॅरेनने मायकेलवर सहा गोळ्या झाडून त्याची हत्या केली. मायकेल हा गुंड असल्याचा पोलिसांचा दावा होता. मात्र या घटनेदरम्यान मायकल हा नि:शस्त्र होता व त्याने पोलिसांना प्रतिकारही केला नसल्याचे उघड झाल्याने पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. वर्णद्वेषातूनच ही हत्या झाल्याची चर्चा फर्गसनमधील सुरु झाली व यानंतर तब्बल महिनाभर फर्गसनमध्ये कृष्णवर्णीयांनी हिंसक आंदोलन केले होते.