अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगासमोर आपले हसू करून घेत आहेत. जगातील युद्धे थांबविल्याचा दावा करत सुटले असून त्यांनी शांततेचा पुरस्कार देणाऱ्या नॉर्वे देशालाच धमकी देऊन टाकली आहे. अशातच या ट्रम्प महाशयांना अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील परिस्थिती आवरता येत नाहीय. ट्रम्प यांच्या विनंतीनंतर वेस्ट व्हर्जिनियाने शेकडो नॅशनल गार्डना वॉशिंग्टनला पाठविण्याची तयारी सुरु केली आहे.
वॉशिंग्टन डीसीला गुन्हेगारी लोकांनी घेरल्याचे आणि उच्छाद मांडल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. निदर्शकांनी संघीय कायदा अंमलबजावणी आणि राष्ट्रीय रक्षक दलांना प्रचंड विरोध केला होता. यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. यामुळे ट्रम्प यांनी राजधानीत डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया होम रूल कायद्याचे कलम ७४० लागू केले होते. वॉशिंग्टन डीसीमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. ती लवकरच दुरुस्त केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी नॅशनल गार्ड्स तैनात केले जात आहेत. त्यांना त्यांचे काम करण्यासाठी मोकळीक देत असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते.
रिपब्लिकन प्रशासनाच्या विनंतीवरून ३०० ते ४०० लोकांचे पथक वॉशिंग्टनला पाठवत असल्याची घोषणा वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक मॉरिसी यांनी शनिवारी केली. ते उपकरणे आणि विशेष प्रशिक्षण सेवांसह वॉशिंग्टनला जातील. वेस्ट व्हर्जिनियासोबतच कॅरोलिना २०० आणि ओहियोने १५० गार्ड पाठविण्याची घोषणा केली आहे.