नेपाळच्या जेनझी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि त्याचा फायदा नेपाळमधील गुन्हेगारांना झाला आहे. तुरुंग फोडल्याने, जाळल्याने या परिस्थितीचा फायदा घेत जवळपास १३ हजार कैदी फरार झालेले आहेत. यात असे कैदी आहेत जे खूप प्रयत्नांनंतर तावडीत सापडले होते. यापैकीच एक जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक अशी ओळख असलेला कैदी पसार झाल्याने नेपाळी पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
चूड़ामणी उप्रेती उर्फ गोरे नेपाल हा सोने तस्करांचा किंग समजला जातो. तो सुंधरा सेंट्रल जेलमधून पळाला आहे. नेपाळच्याच नाही तर जगातील सर्वात कुप्रसिद्ध सोने तस्करांपैकी एक अशी त्याची ओळख आहे. हजारो कोटींच्या सोन्याची तस्करी त्याने आजवर केली आहे. अनेक ठिकाणी सोने लपविलेले आहे. जे लोक सोन्याची तस्करी करत होते त्यांचा खून करून त्याने त्यांचेही सोने हडप केलेले आहे.
ज्या तुरुंगात चुडामणी होता त्या तुरुंगातील ३ हजार कैदी पसार झाले आहेत. यापैकी काही कैदी परतले असून सध्या या कैद्यांची संख्या ५०० झाली आहे. चुडामणी हा सोने तस्करीबरोबरच खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. २०१५ ते २०१८ दरम्यान सुमारे ३८०० किलो सोन्याच्या तस्करीत चुडामणीचे नाव होते. सध्या या सोन्याची किंमत भारतीय रुपयांत ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे बहुतांश सोने भारतात आणले जात होते. ज्या व्यक्तीचा त्याने खून केला त्या व्यक्तीने एकट्याने ३३.५ किलो सोने भारतात आणले होते. या ३८०० किलो सोन्यापैकी एक किलो देखील सोने पोलिसांना सापडलेले नाही.
पळून गेलेल्या कैद्यांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन उदय सेठीचाही समावेश आहे. तो रसुवा तुरुंगातून दुचाकीवरून पळून गेला आहे.