चीनच्या दमदाटीला वेसण घालण्यासाठी हवे धोरण
By Admin | Updated: January 29, 2015 01:20 IST2015-01-29T01:20:58+5:302015-01-29T01:20:58+5:30
दक्षिण चीन सागरातील आणि विभागातील चीनची दांडगाई कमी करण्यासाठी एक रणनीती ठरविण्याची आवश्यकता आहे

चीनच्या दमदाटीला वेसण घालण्यासाठी हवे धोरण
वॉशिंग्टन : दक्षिण चीन सागरातील आणि विभागातील चीनची दांडगाई कमी करण्यासाठी एक रणनीती ठरविण्याची आवश्यकता आहे, असे आग्रही मत अमेरिकेच्या दोन माजी लष्करप्रमुखांनी व्यक्त केले. तसेच चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य आणि आक्रमकपणावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.
सिनेटर जॉन मॅक्केन यांच्या अध्यक्षतेखालील सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीपुढे बोलताना सेवानिवृत्त जनरल जेम्स एन. मॅटिस म्हणाले की, प्रशांत क्षेत्रात चीनसोबतचे संबंध सकारात्मक ठेवण्याचे आमचे प्रयत्न चांगले आहेत. चीन दक्षिण सागर आणि अन्यत्र दादागिरी करणार असेल तर त्यावर अंकुश घालून स्थिती संतुलित करण्यासाठी एक धोरण आखण्याचा प्रयत्न केला जावा.
या संतुलनातून प्रशांत विभागातील सुरक्षा आणि आर्थिक स्थितीतील चीनचा एकाधिकार संपुष्टात आला पाहिजे. तसेच अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने स्थिरता आणि आर्थिक समृद्धी शाबूत ठेवण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांना पाठबळ मिळाले पाहिजे, असे मॅटिस यांनी स्पष्ट केले.
या समितीपुढे बोलताना सेवानिवृत्त जनरल जॉन एम. कीन म्हणाले की, आर्थिक बळावर चीनने लष्करी सामर्थ्य वाढविले आहे. त्या जोरावर चीन शेजाऱ्यांशी आक्रमक भूमिका घेत आहे. चीनने विभागीय वर्चस्वासाठी एक रणनीती अंगीकारली आहे. त्यामुळे अमेरिकेने मित्रदेशांसोबत एक धोरण आखण्याची गरज आहे. (वृत्तसंस्था)