भारतीय शस्त्रास्त्रांच्या यशस्वी कामगिरीने चीनचा कट्टर शत्रू असलेल्या फिलीपीन्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी हवाई तळांवर कोणताही अडथळा न येता अचूक हल्ले केले आणि पाकिस्तानचे चीनी बनावटीचे हवाई संरक्षण प्रणाली (Air Defence System) निकामी ठरले. या घटनेनंतर आता फिलीपीन्सचे सशस्त्र दल (Armed Forces of the Philippines - AFP) प्रमुख जनरल रोमियो ब्राउनर ज्युनिअर यांनी भारताकडून अधिक लष्करी उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जनरल ब्राउनर ज्युनिअर यांनी गुरुवारी रात्री भारतीय नौदलाच्या 'आयएनएस शक्ती (A-57)' या टँकरवर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "आम्ही भारताकडून आणखी लष्करी उपकरणे आणि शस्त्रास्त्रे मागवत आहोत." ते म्हणाले की, भारतीय शस्त्रे अतिशय प्रभावी आहेत, त्यांची गुणवत्ता उच्च आहे आणि ती इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आहेत. याच कारणामुळे फिलीपीन्स भारतासोबतचे संरक्षण संबंध अधिक मजबूत करू इच्छित आहे.
भारताकडून आणखी शस्त्रे खरेदी करण्याची तयारी
सध्या फिलीपीन्सने कोणती शस्त्रे खरेदी करण्याची योजना आखली आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पण ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणालीच्या आणखी दोन बॅटरी लवकरच भारताकडून फिलीपीन्सला मिळतील, असे त्यांनी सांगितले. या क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली खेप एप्रिल २०२४ मध्येच फिलीपीन्सला मिळाली आहे. प्रत्येक बॅटरीमध्ये तीन ते सहा लॉन्चर, ट्रॅकिंग आणि लॉजिस्टिक्स वाहने असतात. फिलीपीन्सचे माजी संरक्षण सचिव डेल्फिन लोरेन्जाना आणि ब्रह्मोस एअरोस्पेसचे महासंचालक अतुल दिनकर राणे यांनी जानेवारी २०२२ मध्ये तीन ब्रह्मोस क्रूझ प्रणालीसाठी करारावर स्वाक्षरी केली होती.
भारतीय नौदलासोबत संयुक्त सराव
याच मुलाखतीत जनरल ब्राउनर यांनी सांगितले की, फिलीपीन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनिअर यांच्या ४ ते ८ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या भारत दौऱ्यादरम्यान फिलीपीन्सची नौसेना भारतीय नौदलासोबत पश्चिम फिलीपीन्स समुद्रात द्विपक्षीय सागरी सहकार्य सराव करणार आहे. या सरावात भारतीय नौदलाची तीन युद्धनौका, 'आयएनएस म्हैसूर' (डेस्ट्रॉयर), 'आयएनएस किल्तान' (एंटी-सबमरीन कॉर्बेट) आणि 'आयएनएस शक्ती' (नेव्हल टँकर) सहभागी होणार आहेत. ही जहाजे याच आठवड्यात मनिला येथे पोहोचली आहेत.
अमेरिकेला बसणार मोठा धक्का?
आजपर्यंत अमेरिका हा फिलीपीन्सचा सर्वात जुना शस्त्रास्त्र पुरवठादार देश राहिला आहे. मात्र, ब्रह्मोस मिसाईल खरेदीनंतर जर फिलीपीन्सने भारतकडून रडार, ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणाली घेतली, तर अमेरिकेचा या बाजारपेठेतील वाटा मोठ्या प्रमाणात कमी होईल. भारताकडून 'तेजस' लढाऊ विमान किंवा 'प्रचंड' हेलिकॉप्टरचीही ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे. फिलीपीन्सच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, भारतीय शस्त्रे कमी किमतीत चांगली गुणवत्ता देतात, तर अमेरिकेची शस्त्रे खूप महाग असतात आणि त्यांच्या देखभालीवरही मोठा खर्च येतो. शिवाय, अमेरिकेच्या शस्त्रांच्या खरेदीसोबत अनेक अटी जोडलेल्या असतात, ज्यामुळे अनेक देश आता अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. जर भारत शस्त्रास्त्र पुरवठादार म्हणून उदयास आला, तर अमेरिकाच्या संरक्षण नेतृत्वाला एक मोठा धक्का बसू शकतो.