भारताची कोंडी करण्यासाठी चीन-पाकची हातमिळवणी, अडवले ब्रम्हपुत्रचे पाणी
By Admin | Updated: October 1, 2016 16:03 IST2016-10-01T14:52:34+5:302016-10-01T16:03:45+5:30
चीनने ब्रम्हपुत्र नदीच्या उपनदीचे पाणी अडवल्याची माहिती समोर येते आहे. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण, भारतासहीत अन्य राष्ट्रामध्ये ब्रम्हपुत्रच्या वाहण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होणार आहे.

भारताची कोंडी करण्यासाठी चीन-पाकची हातमिळवणी, अडवले ब्रम्हपुत्रचे पाणी
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि.1 - उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारत सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या असताना, चीनने भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने ब्रम्हपुत्र नदीच्या उपनदीचे पाणी अडवल्याची माहिती समोर येते आहे. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण, भारतासहीत अन्य राष्ट्रामध्ये ब्रम्हपुत्रच्या वाहण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. यारलुंग झेंगबो असे या उपनदीचे नाव असून त्यावर सर्वाधिक महागडा हायड्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. असे चीनचे म्हणणे आहे.
या प्रकल्पामुळे भारतासमोर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. सिंधू पाणी वापट करार रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाला शह देण्यासाठी पाकिस्तान एकप्रकारे चीनसोबत हात मिळवून भारतावर दबाव निर्माण करण्याचा तर प्रयत्न करत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यारलुंग झेंगबो नदीवरील हायड्रो प्रकल्प 740 मिलियन डॉलर किंमतीचा आहे. जून 2014मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 2019मध्ये पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प तिबेटच्या झीगेज प्रांतामध्ये सुरू आहे. हा प्रांत सिक्कीमपासून जवळ आहे. झीगेज प्रांतातूनच वाहत ब्रम्हपुत्र नदी अरुणाचल प्रदेशात दाखल होते.
दरम्यान, चीनने केलेल्या पाणी अडवणुकीमुळे भारत आणि बांगलादेशावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो, याबाबतची माहिती अजून समोर येऊ शकलेली नाही.